'मी शंकर, कोरोना माझ्या केसातून आला'; अंधश्रद्धेतून पोटच्या 2 मुलींचा खून करणाऱ्या आईचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

अंधश्रद्धेतून सुशिक्षित आई-वडिलांनी आपल्या पोटच्या दोन मुलींची घृणास्पदरित्या हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या रविवारी समोर आला होता.

हैद्राबाद : अंधश्रद्धेतून सुशिक्षित आई-वडिलांनी आपल्या पोटच्या दोन मुलींची घृणास्पदरित्या हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या रविवारी समोर आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सतयुग सुरु होणार आहे, उद्या सूर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, अशी अंधश्रद्धा बाळगत या दांपत्याने हा क्रूर प्रकार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंध्र प्रदेशातील आरोपी दाम्पत्य उच्चशिक्षित असून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी दांपत्याला याप्रकरणी अटक केली आहे. वडील व्ही. पुरुषोत्तम नायडू आणि आई पद्मजा यांनी अंधश्रद्धेतून हा खून केला आहे. आणि आता यातील महिलेने एक वेगळाच दावा केला आहे.

ही महिला अटक केल्यापासून आपल्याच तंद्रीत आहे. शिवाय ती असंबंद्ध अशी बडबड करत आहे. आरोपींची कोरोना आरोग्य चाचणी सुरु असताना ही महिला म्हणाली की, टेस्ट करुन घ्यायला सांगणारे तुम्ही कोण? हा व्हायरस मला काहीही नुकसान करु शकत नाही कारण हा चीनच्या वुहानमधून नव्हे तर भगवान शंकराच्या केसामधून आला आहे. आणि मीच शंकर आहे. येत्या मार्चमध्ये कोरोना संपेल. आता लस वगैरे वापरायची काहीही गरज नाहीये. मी भगवान शंकर आपल्या मदनपल्ले शहराला वाचवीन. मात्र, नंतर त्या महिलेने अशीच बडबड करतच चाचणीसाठी नमुने देण्यात कसेबसे सहकार्य केले. 

हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत 137 रुग्णांचा मृत्यू; 5,50,426 कोरोनाच्या चाचण्या

जेंव्हा तिला या गुन्ह्यासाठी अटक केली गेली तेंव्हा ती चालण्याऐवजी गाणं गात तंद्रीत डान्सच करत होती. मात्र, तिचा नवरा व्ही पुरुषोत्तमने पोलिसांना या चाचण्यांसाठी आवश्यक ते सहकार्य केले.  याबाबत बोलताना मदनपल्लेचे DSP रवी मनोहर चेरी यांनी म्हटलं की, अत्यंत खडतर अडचणींमधून मार्ग काढत आम्ही या दांपत्याच्या आरोग्य चाचण्या केल्या आहेत. या दोघांविरोधात IPC च्या 302 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी तपास केल्यानंतर संबंधित गुन्हे नोंदवले जातील.

मृत दोन मुलींमधील मोठी मुलगी अलेख्या हिने भोपाळमधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. धाकटी मुलगी साई दिव्या हिचं बीबीएपर्यंत शिक्षण झालं आहे. साई दिव्या मुंबईत एआर रहमान म्युझिक स्कूलची विद्यार्थिनी होती. लॉकडाऊनच्या काळात ती घरी परतली होती. नायडू कुटुंब लॉकडाऊनच्या काळात विचित्र वागत होतं, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. रविवारी रात्री घरातून आरडाओरड ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. डोक्यात डंबेल्सनी प्रहार करुन निर्दयी मातापित्याने लेकींचा बळी घेतल्याचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am Lord Shiva I created coronavirus Andhra woman who killed 2 daughters