खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर 'या' मंत्री म्हणतात, 'मी कांदा-लसूण फार नाही खात,'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कांद्याच्या वाढत्या दरावरुन सरकारला धारेवर धरलं.

दिल्ली : सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. गल्ली ते दिल्ली सर्वत्र कांद्याच्या वाढत्या किमतीचीच चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देता-देता एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नावर ‘काळजी करु नका, मी कांदा-लसूण फार नाही खात’ असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले प्रश्न मोदी सरकारला विचारत आहेत. अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरु असताना सुप्रिया सुळेंनी मुद्रा योजना आणि कांद्याच्या वाढत्या किमती यांचा मुद्दा उपस्थित केला.

‘इजिप्तवरुन कांद्याची आयात करण्याचे कष्ट घेणं प्रशंसनीय आहे. मी कांद्याचा सर्वात मोठा संग्राहक असलेल्या महाराष्ट्रातील आहे. माझा पहिला प्रश्न आहे, की कांद्याचं उत्पादन कमी का झालं? दुसरं म्हणजे, नाशिकमधील खासदार भारती पवार माझ्याशी सहमत असतील, मी कोणताही राजकीय मुद्दा उपस्थित करत नाहीये. पण किमान हमीभाव इतका का घसरला? मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, कारण प्रत्येक भारतीयाची भूक भागवली जाते. पण कांद्याचं उत्पादन का घटलं? मला इजिप्शियन कांदा खाण्यात अजिबात रस नाही. भारतीयांनी असं का करावं? आपण तांदूळ, दूध यासारख्या अनेक गोष्टींची निर्यात करतो. आपण गहू-तांदळाचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक आहोत. कांदा उत्पादक हा लहान शेतकरी असतो, त्याच्याकडे पाणी कमी असतं, त्यामुळे त्याला दिलासा द्यायला हवा’ असं सुप्रिया सुळे बोलत होत्या.

भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार

सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री निर्मला सीतारमन उठल्या, तेव्हा एका खासदाराने ‘तुम्ही कांदा खाता का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘मी इतका लसूण, कांदा खात नाही हो, काळजी करु नका, मी अशा कुटुंबातील आहे, जिथे कांदा लसूण यांना फारसं महत्त्व नाही’ असं सीतारमन  म्हणाल्या.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

दरम्यान, कांद्याच्या वाढत्या किंमतींवरुन बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. ‘बाजारात आग लागली आहे सर, सर्व वस्तूंचे भाव वाढत आहेत. भारत सरकार जो कांदा आयात करतो, तो बाजारपेठेत 140 रुपये किलो दराने विकला जात आहे’ असं काँग्रेस खासदार अधीर रंजन म्हणाले. त्यानंतर ‘आपले पंतप्रधान म्हणतात, ना खाणार, ना खाऊ देणार’ असा टोलाही रंजन यांनी लगावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

देशभरात कांद्याचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर परिणाम झाला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कांद्याच्या वाढत्या दरावरुन सरकारला धारेवर धरलं. मला सरकारला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. सरकार इजिप्तहून कांदा मागवत आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं उचलेल्या या पावलाचं मी स्वागत करते. मी महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करते आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं. मात्र यंदा कांद्याच्या उत्पादनात घट का झाली? अनेक अल्पभूधारक शेतकरी कांद्याचं उत्पादन घेतात. तो शेतकरी संकटात आहे. त्याला वाचवण्याची गरज आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I dont eat much onion garlic says nirmala sitharaman during lok sabha price rise row