मी मोठी बहिण गमावली; गडकरी भावूक

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मी जेव्हा पक्षाचा अध्यक्ष होतो, तेव्हा मोठ्या बहिणीप्रमाणे मला नेहमी मार्गदर्शन करत होत्या. माझी तब्येत खराब झाली होती तेव्हा त्या डॉक्टरांना घेऊन माझ्या घरी आल्या होत्या. एक मोठी बहीण म्हणून त्यांनी माझ्यावर प्रेम आणि माया केली.

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज याच्या निधनाना संपूर्ण देश हळहळला. सुषमा स्वराज यांनी त्यांचा स्वभाव आणि वागण्यामुळे भारतीय राजकारणात एक आदर्श महिला नेतृत्व तयार केलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाच्या विस्तारामध्ये त्यांचे मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या जाण्याने देशाचं, पक्षाचं आणि माझं वैयक्तिक नुकसान झालं आहे. मी माझी मोठा बहिण गमावली आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मी जेव्हा पक्षाचा अध्यक्ष होतो, तेव्हा मोठ्या बहिणीप्रमाणे मला नेहमी मार्गदर्शन करत होत्या. माझी तब्येत खराब झाली होती तेव्हा त्या डॉक्टरांना घेऊन माझ्या घरी आल्या होत्या. एक मोठी बहीण म्हणून त्यांनी माझ्यावर प्रेम आणि माया केली. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी देशाचा सन्मान जगभरात वाढविला. त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखविला त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ. स्वराज यांचे अचानक जाणे हे संघटना, देश आणि कौटुंबिक नुकसान आहे असं त्यांनी सांगितले.  

त्यांनी शेवटी जे ट्विट केलं ते भावनिक आणि मनाला वेदना देणारं आहे. कलम 370 हटविण्याचा दिवस पाहण्यासाठी मी थांबली होती अशाप्रकारे त्यांनी सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. सुषमा स्वराज यांच्या निधनाने देशाची जी हानी झाली आहे ती कधीही भरुन येणार नाही या शब्दात नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I lost my elder sister nitin gadkari expressed on Sushma Swaraj death