मला राष्ट्रपती व्हायचंय, काय करू? 

वृत्तसंस्था
Sunday, 8 September 2019

भारताच्या "चांद्रयान-2' मोहिमेला अपयश आले असले तरीसुद्धा देशभरातून "इस्रो'च्या शास्त्रज्ञांना पाठिंबा मिळत आहे.

बंगळूर : भारताच्या "चांद्रयान-2' मोहिमेला अपयश आले असले तरीसुद्धा देशभरातून "इस्रो'च्या शास्त्रज्ञांना पाठिंबा मिळत आहे. विक्रम लॅंडर चंद्रावर उतरण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी "इस्रो'च्या मुख्यालयात गेले होते. या वेळी "इस्रो' मुख्यालयात उपस्थित विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

"चांद्रयान-2' मोहिमेचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्याची संधी देशभरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषेतून देशभरातून यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. त्यात मोदींनी विद्यार्थ्यांना आयुष्यात अपयशानं खचून न जाण्याचा सल्ला दिला तसेच भरपूर अभ्यास करण्यासही सांगितले. 

काय झाला संवाद? 

या संवादामध्ये एका विद्यार्थ्याचा प्रश्न लक्षवेधी ठरला. त्यात विद्यार्थ्याने मला देशाचा राष्ट्रपती व्हायचे आहे. त्यासाठी मी काय करू? असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारला. त्यावर मोदींनी त्या विद्यार्थ्याला राष्ट्रपती का? पंतप्रधान का नाही? असा प्रतिसवाल केला. या वेळी विद्यार्थ्यांनी मोदींना प्रश्‍न विचारण्यासाठी अक्षरश: गराडा घातला होता.

काहींनी त्यांच्याकडून स्वाक्षरी घेतली तर काहींनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. मोदींनीही त्यांना फोटो काढू दिले. मोदींनी या विद्यार्थ्यांपैकी एका मुलीला तू घरी गेल्यानंतर लोकांना चांद्रयान-2 विषयी काय सांगशील? असा प्रश्न विचारला. त्यावर त्या विद्यार्थिनीने चांद्रयानाच्या विक्रम लॅंडरचा संपर्क तुटला असे सांगेन, असे उत्तर दिले. या विद्यार्थ्यांमध्ये काही भूतानच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यांच्याशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. तुम्ही इथे भारतात काही मित्र बनवले आहेत का? असा प्रश्न मोदींनी भूतानच्या विद्यार्थ्यांना विचारला. 

चांगला अभ्यास करा आणि कष्ट करा. आयुष्यात काहीही साध्य करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात ध्येय मोठे ठेवा आणि आणि छोट्या गोष्टी करून ते साध्य करा. त्यासाठी मेहनत घ्या. तुमच्या हातून काही निसटलं असेल तर ते विसरून जा आणि काही साध्य झालं नाही तर निराश होऊ नका, असा सल्लाही दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Want to become President what i Do student Asking to PM Modi