COVID 19 - भारतातील 3 लशींबाबत ICMR ने दिली आनंदाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

आयसीएमआरचे महासंचालक डॉक्टर भार्गव म्हणाले की, अमेरिका आणि युरोपिय देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. नंतर आटोक्यात आल्यानंतरही दुसरी लाट निर्माण झाली. यातून आपण धडा घेण्याची गरज आहे. 

नवी दिल्ली - भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 90 हजारांनी वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असल्यानं ही बाब दिलासा देणारी आहे. तसंच भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही कमी आहे. मात्र असं असलं तरीही रुग्णवाढीची आकडेवारी चिंताजनक असल्याचं नाकारता येत नाही. जगभरात कोरोना लशीवर काम सुरू असून ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी पुन्हा सुरु झाली आहे. भारतातील लशींबाबत माहिती देताना आयसीएमआरने सांगितलं की, भारतात तीन लशी क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत. 

जगभरात कोरोनाचं संकट आहे. अनेक देश या संकटाशी सामना करत आहेत. काही देशांमध्ये लशींवर संशोधन सुरू आहे. भारतही याबाबतीत कमी नाही. भारतात तीन कोरोनाच्या लशींची क्लिनिकल ट्रायल सुरू असल्याची माहिती आयसीएमआरचे डॉक्टर बलराम भार्गव यांनी दिली. 

बलराम भार्गव म्हणाले की, कॅडिला आणि भारत बायोटेक यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत. दुसरीकडे ऑक्सफर्ड लशीची चाचणी सिरम इन्स्टिट्यूट भारतात घेत आहे. सिरमने फेज 2 मध्ये बी 3 चाचणी पूर्ण केली असून आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु असल्याची माहिती आयसीएमआरने दिली. 

कोरोनाचा सर्वात मोठा दणका अमेरिकेसह युरोपातील देशांना बसला. सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉक्टर भार्गव म्हणाले की,  अमेरिका आणि युरोपिय देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. नंतर आटोक्यात आल्यानंतरही दुसरी लाट निर्माण झाली. यातून आपण धडा घेण्याची गरज आहे. भारतात पहिल्या लाटेवेळी लॉकडाऊन योग्य पद्धतीने केले गेले. असं झालं नसतं तर भारतात मोठा धोका निर्माण झाला असता. यातून किती मृत्यू झाले असते याचा आकडाही सांगता आला नसता असंही भार्गव यांनी म्हटलं. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: icmr says 3 vaccines at clinical trial stage in India