esakal | "कृषी कायदे मागे घेतले तर मोदी अधिक ताकदवान नेते म्हणून पुढे येतील"
sakal

बोलून बातमी शोधा

modi

भारतीय कृषी क्षेत्रात सुधारणांची गरज या विषयावर एका मुलाखतीत बोलताना शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी कृषी कायदे रद्द करण्याची गरज व्यक्त केली. तसेच अकली दलाकडून विधानसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती आखण्यात येत असल्याचे सांगितले.  

"कृषी कायदे मागे घेतले तर मोदी अधिक ताकदवान नेते म्हणून पुढे येतील"

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कृषी कायदे रद्द केले तर ते अधिक ताकदवान आणि लोकप्रिय नेते म्हणून पुढे येतील, असं भाकित शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल (Sukhabir Singh Badal) यांनी केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. आपला पक्ष हा देशातील सर्वात मोठा शेतकऱ्यांचा पक्ष असल्याचा दावाही बादल यांनी केला आहे. पंतप्रधानांनी वादाचा मुद्दा आपल्या पद्धतीने थोपवण्याऐवजी तो सोडवणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये निर्माण झालेली कुठिंतावस्था सोडवण्यासाठी काय मार्ग असेल? या प्रश्नावर बोलताना बादल म्हणाले, "पंतप्रधानांचे विचार स्पष्ट असून ते आपल्या निर्णयाबाबत अत्यंत ठाम असतात. आपला निर्णय मागे घेण्यासाठी ते तयार नसतात. मात्र, ही बाब लोकशाहीसाठी योग्य नाही. लोकशाहीमध्ये कायम आदान-प्रदान प्रक्रिया चालते. मात्र, ठामपणा हा हुकुमशाहीमध्ये असतो जसे की पुतिन (Putin). भारतासारखा देश जो विविधतेने नटला आहे तिथे पंतप्रधानांनी निर्णय थोपवण्याऐवजी ती परिस्थिती योग्य प्रकारे हाताळायला हवी." 

कृषी क्षेत्रात सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत नाही का? या प्रश्नावर बादल म्हणाले, "कृषी क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहेत. पण या सुधारणा प्रत्यक्ष दिसणाऱ्या हव्यात, केवळ पुस्तकी नकोत. आम्हाला अधिक कोल्ड चेन्स (cold chains) हव्यात, अधिक अन्न प्रक्रिया (food prossesing) उद्योग हवेत. भारतात केवळ २० टक्के अन्नावर प्रक्रिया केली जाते तर पोलंडमध्ये हे प्रमाण ८० टक्के आहे. मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया करणं तसेच हे प्रक्रिया केलेलं अन्न निर्यातही व्हायला हवं." 

...तर मोदी अधिक सक्षम नेते म्हणून पुढे येतील - बादल

कृषी कायदे रद्द करणे हा एकच पर्याय आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना सुखबिरसिंग बादल म्हणाले, "सरकारने कायदे केले आहेत मात्र जनतेला ते नको आहेत. यावर सरकार का विचार करत नाही. जर हे कृषी कायदे मोदींनी रद्द केले तर ते अधिक ताकदवान आणि बडे नेते म्हणून पुढे येतील. पंतप्रधानांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्यच असेल असं नाही. जो माणूस आपला कमकुवतपणा मान्य करतो तो मोठा व्यक्ती असतो आणि त्यामुळे ती व्यक्ती अधिक लोकप्रियही बनते." 
 

loading image
go to top