
लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडप्यांबाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्वाची टिपण्णी केली आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडप्यांबाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्वाची टिपण्णी केली आहे. लग्न न करता पती-पत्नी म्हणून राहणाऱ्या जोडप्यांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यास तो बलात्कार कसा ठरेल? अशी विचारणा सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी केली आहे. तसेच लग्नाचं खोटं आश्वासन देणं चुकीचं असल्याच मतंही कोर्टानं नोंदवलं आहे. तसेच याप्रकरणी आरोपी तरुणाला चार आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
याप्रकरणी याचिकाकर्त्या तरुणीनं आरोप केला की, संबंधित तरुणानं फसवून आपली संमती मिळवत मनाली येथील एका मंदिरात नेऊन लग्न केलं, त्यानंतर गैरफायदा घेतला. या तरुणीनं आपल्यावर बलात्कार झाल्याचं कोर्टाला सांगितलं.
तर आरोपी तरुणानं कोर्टासमोर म्हटलं की, त्याने मुलीच्या सहमतीनं संबंध ठेवले होते. आरोपीच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं की, या दोघांमध्ये लग्न झालेलं नाही ते केवळ सोबत राहत होते. त्यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर संबंधित तरुणीनं एफआयआर दाखल केली आहे. यापूर्वी तिनं या सर्व गोष्टींचा कधी उल्लेखही केला नव्हता.
तरुणीच्या माहितीनुसार, दोघेही दोन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, २०१९मध्ये तरुणाने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. पण लिव्ह इनमध्ये राहत असताना तो तरुणीला बेदम मारहाण करत होता. तरुणीने याबाबतच वैद्यकीय प्रमाणपत्रही कोर्टात सादर केलं.
भारत India