IFFI 2022 : लाइट... कॅमेरा.. ॲण्ड ॲक्शन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IFFI 2022

IFFI 2022 : लाइट... कॅमेरा.. ॲण्ड ॲक्शन!

पणजी : चंदेरी दुनियेचा महाकुंभ असलेल्या भारताच्या ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज दिमाखदार सुरुवात झाली. राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत बॉलिवूड आणि हॉलीवूडमधील तारकांसमवेत रंगलेला हा भव्यदिव्य सोहळा पुढील आठ दिवसांची आश्वासक नांदी ठरला.

ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये ५३व्या इफ्फीला अधिकृतरीत्या प्रारंभ झाला. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याचे उद्‍घाटन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्‍यमंत्री डॉ. एल. मुरगुन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी अभिनेते परेश रावल, वरुण धवन, सुनील शेट्टी, मनोज वाजपेयी, सारा अली खान आदी उपस्थित होते.

तब्बल २८० आंतरराष्ट्रीय चित्रपट

  • इफ्फीच्या ५३ व्या आवृत्तीत प्रथमच ७९ देशांतील २८० आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटांपैकी ३० टक्क्यां पेक्षा जास्त म्हणजे ५० ते ६० हून अधिक महिला दिग्दर्शकांचे चित्रपट इफ्फीमध्ये रसिकांना पाहता येणार आहेत.

  • आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात १५ चित्रपटांमध्ये प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयुरासाठी चुरस आहे. चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या, कला आणि राजकारण अशा बहुसंख्य प्रचलित विषयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेत १२ आंतरराष्ट्रीय आणि ३ भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

  • इंडियन पॅनोरमा विभागात यंदा ४५ चित्रपटांची निवड झाली आहे. पैकी २५ चित्रपट हे फीचर फिल्म प्रकारातील असून, २० चित्रपट लघुपट श्रेणीतील आहे.

चित्रपट संस्कृती रुजतेय...

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात पहिल्यांदा आणले. तेव्हापासून गोव्यात हा चित्रपट महोत्सव सलगपणे आयोजित केला जातोय. गोवा हे इफ्फीचे कायमस्वरूपी केंद्र बनविण्यासाठी राज्यात साधनसुविधा उभारण्यात येत आहेत. साधनसुविधा उभारल्या गेल्या तर त्याचा राज्याच्या चित्रपट सृष्टीला फायदा होईल. गोव्यात चित्रपट संस्कृती रुजण्यास मोठी मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उद्‍घाटनापूर्वी एका वृत्तसंस्थेला सांगितले.

चित्रपट सर्व घटकांपर्यंत पोहोचविणार

चित्रपट हा सर्वांसाठी असावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आम्ही यंदाच्या चित्रपट महोत्सवात दिव्यांगांसाठी खास विभाग तयार केला आहे. या माध्यमातून दिव्यांगांनाही चित्रपटाची संधी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गोव्यातील महोत्सवाची खासियत : ठाकूर

प्रादेशिक सिनेमा आणि अन्य चित्रपट ज्यांना कुठेच व्यासपीठ मिळत नाही, असे दर्जेदार चित्रपट गोव्यातील इफ्फीत पोहोचतात, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सांगितले. चित्रपट निर्माते एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा २०२२ मधील भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे, असेही ते म्हणाले.