IIT मध्ये ऍडमिशन घ्यायचंय? मग तुमच्यासाठी आहे ही महत्त्वाची बातमी

कृपादान आवळे
शनिवार, 18 जुलै 2020

बारावी बोर्ड परीक्षेत 75 टक्के गुणांची असणारी अट काढून टाकण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना व्हायरसमुळे सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी'ने (IIT) प्रवेश प्रक्रियेत बदल केला. त्यानुसार, बारावी बोर्ड परीक्षेत 75 टक्के गुणांची असणारी अट काढून टाकण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

भारतात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार खबरदारी म्हणून बारावीच्या काही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. पण आता त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2020-21 मध्ये IIT च्या नियमांमधील या बदलांना मान्यता दिली आहे. त्यामुळे आता IIT प्रवेशासाठी बारावीमध्ये 75 टक्के गुण असावेत, ही अट काढून टाकण्यात आली आहे. विद्यार्थी जर फक्त बारावी उत्तीर्ण असेल तर अशा विद्यार्थ्यांनाही IIT मध्ये प्रवेश घेता येणार आहे.

IIT प्रवेशातील नियमात बदल करण्याचा निर्णय संयुक्त प्रवेश बोर्ड, IIT ने घेतल्याची माहिती मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे दिली. 

बारावीत 75 टक्के गुणांची अट

IIT मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी JEE ऍडवान्स परीक्षा पास होण्यासह बारावीत किमान 75 टक्के गुण मिळणे गरजेचे होते. तसेच पात्रता परीक्षेत 20 टक्के निकष लावले जात होते. पण आता ही अट काढण्यात आली असून, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही IIT मध्ये प्रवेश घेता येणार आहे.

हजारो विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

IIT मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी अनेक विद्यार्थी धडपड करत असतात. पण आता सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा दिलासा देशातील हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IIT relaxes admission criteria due to COVID 19