शाहीन बागेतून बुलडोझर ‘बडे बेआबरू' होऊन परतला ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

illegal encroachments Shahinbagh opposition of citizens South Delhi

शाहीन बागेतून बुलडोझर ‘बडे बेआबरू' होऊन परतला !

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील शाहीनबाग भागातील कथित अवैध अतिक्रमणे बुलडोझरने जमीनदोस्त करण्याचे तेथील महापालिकेचे मनसुबे स्थानिक नागरिकांच्या उस्फूर्त व जबरदस्त विरोधासमोर आज पुरते निष्फळ ठरले. अडीच तासांच्या ‘हाय व्हेल्टेज' नाट्यानंतर माघारी गेलेल्या महापालिका पथकाची स्थिती ‘बडे बेआबरू होकर तेरे कूचेसे हम निकले‘ अशी झाली. दुसरीकडे या प्रकरणाची सुनावणी घेण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने, यात राजकीय पक्ष का लुडबूड करत आहेत ? असे ताशेरे ओढले. दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यान यांनी आमदार अमानतुल्ला खान व नगरसेवक अब्दुल वाजीद खान यांच्यावर सरकारी कामात अडथळे आणल्याचा गुन्हा नोंदविण्याचा इशारा दिला आहे.(illegal encroachments Shahinbagh oppose from resident )

दिल्लीतील जहांगीरपुरी भागात तेथील भाजपच्या ताब्यातील महापलिकेने अचानक कारवाई करून अनेक गरीबांची घरे व दुकाने पाडून टाकली होती. त्यापाठोपाठ भाजपच्याच दक्षिण दिल्ली महापिलेकला शाहीन बाग भागातील अतिक्रमणांची संख्या फारच वाढल्याचे ‘लक्षात आले‘. त्यानंतर या भागातील नागरिकांना नोटीसा गेल्या व अवैध अतिक्रमणे हटविण्याची कारवाई आज करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. नागरिकता दुरूस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात २०१९ मध्ये झालेल्या जबरदस्त निदर्शनांमुळे चर्चेत आलेल्या शाहीन बागेतील या प्रस्तावित कारवाईचीही जोरदार चर्चा गेले काही दिवस होती. या भागात अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज सकाळी बुलडोझरसह महापालिकेचे पथक तेथे पोहोचताच स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केला. अनेकांनी बुलडोझरसमोर रस्त्यावरच धरणे धरले.

‘आप' चे स्थानिक आमदार अमानतुल्ला खान यांनी, भाजप या भागात दंगली घडविण्याचे कारस्थान करत आहे असा आरोप केला. येथे अतिक्रमणे नाहीत व जी असतील ती आम्ही हटवू. तुम्ही यात पडू नका व आलात तसे माघारी जा, असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला. हा प्रचंड विरोध पाहता व परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच महापालिकेला ‘वरून' सूचना गेल्या व अडीच तासांच्या नाट्यानंतर महापालिकेचे पथक फौजफाट्यासह माघारी फिरले. शाहीन बाग वेल्फेअर संघटनेने, नोटीसा मिळालेल्यांत बहुसंख्य हिंदू दुकानदार व गरीब लोक असल्याचे सांगतानाच महापालिका शाहीन बागेचे नाव बदनाम करण्यासाठी राजकीय सूडबुध्दीने कारवाई करत असल्याचा आरोप केला. येथील एका मशिदीसमोर असलेले एक व अन्य एक अतिक्रमण आपण स्वतः हटविले असा दावा आमदार खान यांनी केला.

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करण्यास नकार देऊन दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली. न्या. भूषण गवई व न्या. नागेश्वर राव यांच्या पीठाने, हे प्रकरण जहांगीरपुरी पेक्षा वेगळे आहे काय, असा सवाल केला. याचिकाकर्त्यांत माकपचे नाव पाहताच न्यायमूर्तींनी या प्रकरणात ‘यांनी‘ दखल देण्याचे काय कारण? हा राजकीय वाद आहे का? असे ताशेरे ओढले.

असे घडले नाट्य -

सकाळी १०.०० - महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक साहीन बागेतील डी ब्लॉकमध्ये पोहोचले.

१०.१५- एक बुलडोझर घटनास्थळी आला.

१०.३० दिल्ली पोलिस व सीआरपीएफची पथके शाहीन बागेत दाखल.

१०.४५ शाहीन बागेतील नागरिक प्रचंड संख्येने घटनास्थळी जमले. नागरिकांकडून जोरदार निषएध प्रदर्शने सुरू. यात आप व कांग्रेसचे काही कार्यकर्तेही सामील.

११.००- पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

११.१५ - आमदार अमानतुल्ला व नगरसेवक अब्दुल वाजीद खान समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले.

११.२० परिस्थिती तणावपूर्ण. हजारोंचा जमाव महापालिकेच्या पथकाला विरोध करण्यासाठी घटनास्थळी आला.

११.३० एका दुकानासमोर लावलेल्या लोखंडी जाळ्यांजवळ बुलडोझर पोहोचताच नागरिक आणखी संतापले.

१२.०० - आमदार व बाजार संघाच्या पदाधिकाऱयांनी, या जाळ्या आम्ही हटवू असे महापालिका पथकाला सांगितले.

१२.३० - स्थानिकांच्या हस्तक्षेपानंतर लोखंडी जाळ्या हटविण्यात आल्या.

१२.४० बुलडोझर माघारी परतला. महापालिका अधिकारीही परत फिरले.

Web Title: Illegal Encroachments Shahinbagh Opposition Of Citizens South Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhiDesh newsEncroached
go to top