'कोरोनील'च्या मान्यतेवर IMAचा आक्षेप; देशाला स्पष्टीकरण देण्याची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

टीम ई-सकाळ
Monday, 22 February 2021

पतंजली आयुर्वेदनं करोनावरील औषध म्हणून 'कोरोनील' हे औषध बाजारात आणलं असून त्याला ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) मान्यता दिल्याचे पतंजलीकडून जाहीर करण्यात आलं आहे.

पतंजली आयुर्वेदनं करोनावरील औषध म्हणून 'कोरोनील' हे औषध बाजारात आणलं असून त्याला ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) मान्यता दिल्याचे पतंजलीकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे वाद निर्माण झाला असून इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) यावर आक्षेप घेतला आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना देशाला याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
 
आयएमएनं कोरोनीलच्या मान्यतेवर आक्षेप घेत याची कडक शब्दांत निंदा केली आहे. तसेच आरोग्य मंत्री चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या अवैज्ञानिक उत्पादनाला देशात कसं काय प्रौत्साहन देऊ शकतात? असा सवालही केला आहे.

दरम्यान, बाब रामदेव यांनी कोरोनील लॉन्च केल्यानंतर डब्ल्यूएचओनं एका ट्विटद्वारे हे स्पष्ट केलं होतं की, "संघटनेनं कोविड-१९च्या नियंत्रणासाठी कोणत्याही पारंपारिक औषधाला मान्यता किंवा प्रमाणपत्र दिलेलं नाही. यावर आयएमएनं म्हटलं की, आरोग्यमंत्री जे स्वतः एक डॉक्टर आहेत त्यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आलेल्या अशा एका औषधाबाबत डब्ल्यूएचओनं प्रमाणित केल्याचं खोटं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी याबाबत देशाला स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी आयएमएनं केली आहे.

भारताचे आरोग्यमंत्री या नात्यानं संपूर्ण देशासमोर अशा प्रकारचे खोटं अनुमान प्रसिद्ध करणं, जनतेसमोर खोटं प्रचलित आणि अवैज्ञानिक उत्पादनं लॉन्च करणं, देशात अनैतिक, चुकीचं आणि चुकीच्या पद्धतीनं उत्पादनाला प्रोत्साहन देणं किती नैतिक आहे? असे अनेक सवाल आयएमएनं केले आहेत. तसेच आरोग्य मंत्र्यांकडून संपूर्ण देशात एका अवैज्ञानिक औषधाची मनाप्रमाणे मांडणी करणं तसेच डब्ल्यूएचओकडून त्याचं खंडन केलं जाणं, हे देशातील लोकांसाठी अपमानजनक आहे. कोरोनील खरंच कोरोनापासून बचावासाठी उपयुक्त आहे तर सरकार लसीकरणावर ३५ हजार कोटी रुपये का खर्च करत आहे? असा सवालही आयएमएनं केला आहे.

पतंजलीने एका निवेदनात म्हटलं की, कोरोनीलला केंद्रीय औषध नियंत्रण संघटनेनं (डीसीजीआय) आयुष खंडाच्या डब्ल्यूएचओच्या प्रामाणनं योजनेंतर्गत फार्मास्युटिकल प्रॉडक्ट (सीओपीपी)चं प्रमाणपत्र दिलं आहे. या निवेदनात दावा करण्यात आला आहे की, सीओपीपीच्या अतंर्गत कोरोनील औषध आता १५८ देशांत निर्यात केलं जाऊ शकतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMAs objection to coroneel certification Demand to the Health Minister to give an explanation to the country