इम्रान खान 'आरएसएस'वर घसरले

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 August 2019

इम्रान खान यांनी संयुकत राष्ट्रसंघ, अमेरिका, रशिया व तालिबानकडूनही चपराक बसल्यावर आता संघाकडे मोर्चा वळविला आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी जगभरात गायलेले रडगाणे ऐकण्यास कोणी तयार नसल्यानंतर इम्रान यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. त्यांनी आज (रविवार) ट्‌विट करून "कलम 370 रद्द करण्यास संघच जबाबदार असून संघाची विचारसरणी हिंदू श्रेष्ठतेची आहे,'' असे म्हटले.

भाजपने यावर पलटवार करताना म्हटले की, भारताने आपल्याच एका अविभाज्य प्रदेशाबद्दल केलेल्या निर्णयामुळे पाकिस्तान किती पिसाळला आहे हेच कळते. कारण इम्रान यांना जगात कोठेही भाव मिळेनासा झाला आहे.

भाजपने इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हटले की, त्यांच्या या कृतीमुळे हेच पुन्हा सिध्द झाले की, जगाला भारतापासून नव्हे, तर पाकिस्तानच्या दहशतवादापासूनच खरा धोका आहे. भाजप नेते राम माधव यांनी सांगितले की, भारताने जिना यांच्या द्विराष्ट्रवादाच्या व शेख अब्दुल्ला यांच्या त्रिराष्ट्रवादाच्याही सिद्धांताला पुन्हा पुन्हा नाकारलेले आहे. इम्रान खान स्वतःच्या देशातील धार्मिक दहशतवादाला संपवण्याची हिंमत दाखवतील का?

इम्रान खान यांनी संयुकत राष्ट्रसंघ, अमेरिका, रशिया व तालिबानकडूनही चपराक बसल्यावर आता संघाकडे मोर्चा वळविला आहे. कलम 370 रद्द करण्याचा एतिहासिक निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारच्या मातृसंस्थेवर लाथा झाडल्या, तर आपली दखल घेतली जाईल, या आशेतून इम्रान यांनी हे ताजे ट्‌विट केल्याचे जाणकार मानतात. इम्रान खान यांनी कलम 370 च्या निर्णयाच्या धडाकेबाज अंमलबजावणीमुळे झालेली चिडचिड व्यक्त करताना पुन्हा संघावर टीका केली आहे. पाकच्या संयुक्त संसदेत बोलतानाही त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा उल्लेख करून, अशीच टीका केली होती.

बदाहूशहा जफर नव्हे, तर टिपू सुलतानच्या मार्गाने जाण्याची भाषा त्यांनी संसदेत केली होती. आण्विक ब्लॅकमेलिंग व युध्दखोरीची भाषा करताना मोदी सरकारला त्यांनी 'रेसिस्ट' म्हटले होते. मात्र त्यानंतरही जगभरातून त्यांना झिडकारल्याने चिडलेल्या इम्रान यांनी आज नवे ट्‌विट केले.

त्यात त्यांनी संघावर निशाणा साधताना म्हटले की, 'आरएसएस'च्या नाझी विचारसरणीच्या प्रभावातूनच काश्‍मीरमध्ये आज संचारबंदी व कैदखान्यासारखी स्थिती आहे. काश्‍मीरची डेमोग्राफी बदलण्याचे हे कारस्थान भारताने सुरू केल्याचा दावा त्यांनी केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan criticize on RSS