esakal | RT-PCR टेस्टवर विश्वास ठेवायचा कसा? लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह

बोलून बातमी शोधा

कोरोना टेस्ट
RT-PCR टेस्टवर विश्वास ठेवायचा कसा? लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह
sakal_logo
By
आशिष कदम

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची दुसरी लाट पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक ठरताना दिसत आहे. कारण आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचणीचे रिपोर्ट सध्या चुकीचे येत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाग्रस्त (Covid Positive) व्यक्तीचा चाचणी अहवाल नकारात्मक येऊ लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखणे आणखी कठीण होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे चाचणी अहवाल नकारात्मक येत आहेत. रुग्णांची वारंवार चाचणी घेतली तरी निकाल योग्य मिळत नाही.

आतापर्यंत सापडले बरेच रुग्ण

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आकाश हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आशिष चौधरी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत आम्हाला असे बरेच रुग्ण सापडले आहेत, ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचणी आहेत आणि त्यांच्या सीटी स्कॅनमध्येही समस्या आहेत. ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. पण असे असतानाही त्यांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले.

ब्रोन्कोअलवेलर लावेज (Bronchoalveolar Lavage) ठरली प्रभावी

डॉ. चौधरी म्हणाले की, काही रूग्णांमध्ये ब्रोन्कोअलवेलर लावेज पद्धतीने निदान करण्यात आले. ज्यामध्ये तोंड किंवा नाकाची तपासणी एका ट्यूबद्वारे केली जाते. या तपासणीत कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण सकारात्मक आढळले, ज्यांचा आरटीपीसीआर अहवाल नकारात्मक होता. यावरून असे दिसून येते की, कोरोनाचा नवा स्ट्रेन आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचणीवेळी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीला जुमानत नाहीय.

ही कारणे असू शकतात

यामागची कारण स्पष्ट करताना डॉ. प्रतिभा काळे म्हणाल्या की, 'रुग्णाच्या घशात किंवा नाकात कोरोनाचा विषाणू आढळून न येणे हे शक्य आहे. त्यामुळे त्या रुग्णांच्या कोरोना चाचणीचे अहवाल नकारात्मक आले. फुप्फुसामध्ये आढळणाऱ्या एस रिसेप्टर (ACE Receptor) प्रथिनामध्ये कोरोनाने आपले बस्तान बसवल्याने हे अहवाल नकारात्मक येत होते. ब्रोन्कोअलवेलर लावेज पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीमध्ये फुप्फुसातून नमुने घेण्यात आले, तेव्हा त्या रुग्णांमध्ये कोरोना आढळून आला.

१५ ते ३० टक्के रुग्ण प्रभावित

मॅक्स हेल्थकेअरमधील पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विवेक नागिया म्हणाले की, १५ ते ३० टक्के रुग्ण हे या समस्येतून जात आहेत. कोरोनाची लक्षणे असूनही चाचणी अहवाल नकारात्मक येणं ही एक गंभीर समस्या आहे. कारण असे रुग्ण व्हायरस पसरविण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण होऊ शकते.

कोरोनाचे बदललं रूप

गंगा राम हॉस्पिटलच्या चेस्ट मेडिसिन विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अरूप बासू म्हणाले की, आता कोरोना रूग्णांमध्ये नाक वाहणे, सर्दी यांसारखी लक्षणे दिसू लागली आहेत. बर्‍याच रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यात अडचणी येत नसतात आणि त्यांचा सीटी स्कॅन अहवालही सामान्य असतो, पण त्यांना अनेक दिवसांपासून ताप येत आहे, ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले आहे.