कलम ३७० रद्द केल्यानंतर रोजगारात वाढ; पंतप्रधान नरेंद्र मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Increase in employment after abrogation of Article 370 pm narendra modi

कलम ३७० रद्द केल्यानंतर रोजगारात वाढ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर तेथे रोजगार वाढला असून २०१९ नंतर ३० हजार जणांना सरकारी नोकरीची संधी मिळाली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केला. जम्मू काश्मीरमधील तीन हजार तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्र सोपविल्याचेही त्यांनी सांगितले. यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व नागरी पुरवठा, पशुपालन, पाणीपुरवठा यासारख्या सरकारी विभागांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीर रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. जम्मू -काश्मीरमधील तरुणांना रोजगाराच्या निमित्ताने प्रशासकीय प्रवाहात आणण्यासाठी रोजगार मेळावा हे सरकारसाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. मोदींनी सांगितले, की आता जुन्या गोष्टी सोडून नव्या संधींचा लाभ घेण्याची वेळ आली आहे.

आपले तरुणच आता जम्मू काश्मीरमधील विकासाची गाथा लिहितील. काश्मीरमध्ये २० वेगवेगळ्या ठिकाणी तीन हजार तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे दिली जात आहेत. याकडे लक्ष वेधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की आगामी काळात अन्य विभागांमध्ये देखील ७०० हून अधिक नियुक्तीपत्रे दिली जातील. २१ व्या शतकामधील हे दशक जम्मू काश्मीरच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे दशक आहे. आपल्याला नव्या विचारांनी काम करावे लागेल. नव्या व्यवस्थेत जम्मू काश्मीरमध्ये विकासाने गती घेतली आहे. या प्रदेशात रोजगार मेळाव्याचे वेगळेच महत्त्व आहे, असा उल्लेख करताना मोदी यांनी या केंद्रशासित प्रदेशात २०१९ पासून आतापर्यंत ३० हजार सरकारी पदांवर नोकर भरती झाली असल्याचे सांगितले. यातील २० हजार नोकऱ्या मागील वर्षात देण्यात आल्या असल्याचा दावाही मोदींनी केला. जम्मू काश्मीरमध्ये ज्या प्रकारे पायाभूत सुविधांचा विकास आणि संपर्क व्यवस्था वाढते आहे, त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या विकासाला बळकटी मिळेल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

नायब राज्यपालाचे कौतुक

जम्मू काश्मीरच्या जनतेला भ्रष्टाचाराचा तिटकारा आहे, अशी भावनिक साद घालताना मोदी म्हणाले, की येथील जनतेने नेहमी पारदर्शकतेवर भर दिला आहे. सरकारी नोकरीत येणाऱ्या तरुणांनी पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे. याआधीही जम्मू काश्मीरच्या लोकांशी भेट होत होती. तेव्हा त्यांची वेदना नेहमी जाणवायची. प्रशासकीय व्यवस्थेमधील भ्रष्टाचारही वेदना होती. जम्मू काश्मीरमधील लोक भ्रष्टाचाराचा तिरस्कार करतात. नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि त्यांचे सहकारी भ्रष्टाचाराचा आजार संपविण्यासाठी जिवापाड मेहनत करत असल्याचे प्रशस्तीपत्र पंतप्रधानांनी बहाल केले. जम्मू काश्मीर हे प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे. सर्वांच्या एकजुटीने जम्मू काश्मीरची प्रगती होईल, असा विश्वासही मोदींनी बोलून दाखवला.