मद्यप्राशन केल्याने होणाऱ्या रोगांच्या आकडेवारीत वाढ

तेजश्री कुंभार
गुरुवार, 5 जुलै 2018

मद्यप्राशनामुळे होणाऱ्या रोगांच्या आकडेवारीतही 2005 ते 2018 या सालात सुमारे 10 टक्‍के वाढ झाली असल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेश पाटील यांनी दिली.

पणजी - गेल्या तेरा वर्षांचा अनुभव आणि निरीक्षण पाहता प्रथम मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्‍तीचे वय 25 वरून अवघ्या बाराव्या वर्षावर येऊन ठेपले आहे. मद्यप्राशनामुळे होणाऱ्या रोगांच्या आकडेवारीतही 2005 ते 2018 या सालात सुमारे 10 टक्‍के वाढ झाली असल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेश पाटील यांनी दिली.
 
2005 सालापासून गोमेकॉचे काम पाहत त्यांनी मद्यपानविरहीत समाज निर्माण व्हावा म्हणून विविध माध्यमातून आपले योगदान दिले आहे. त्यांनी केलेल्या कामाप्रती देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गौरविले आहे, यानिमित्त दै. गोमन्तक प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. 

तरुण पिढी मद्यपानाच्या आहारी जाण्यामागचे मोठे कारण म्हणजे कमी पैशात सहज उपलब्ध होणारे मद्य. कुटुंबीयच मुलांसमोर मद्यप्राशन करीत असल्याने मद्याबाबतीत मुलांच्यात टोकाचे आकर्षण असते. त्यांना दिला जाणार पॉकेटमनी चांगला असल्याने अगदी 60 रुपयांत मिळणारा मद्याचा टीन घेण्यास त्यांना अधिक वेळ खर्चावा लागत नाही आणि त्यांना लहान वयातच मद्याची आवड निर्माण होते, असे डॉ. पाटील म्हणाले. 

मद्यपानप्राशनाचे वय कमी झाल्याने त्यामुळे होणाऱ्या रोगांचे वयही कमी झाले आहे. मूत्रपिंडाचे, पोटाचे रोग या गोष्टी मद्यप्राशन करणाऱ्यांना सतावत तर आहेतच पण काही नव्या समस्यांनीही त्यांच्या आयुष्यात डोके घातले आहे. सवयींशी निगडित असणाऱ्या ड्रंकोरेक्‍सिया नावाच्या आजाराला आता मद्यपान करणारी किशोरवयीन मुले आणि मुलीही बळी पडत आहेत. रोज मद्य पिल्याने स्वभाव आक्रमक होऊन मनाची तसेच शरीराची अवस्था या आजारामुळे चंचल होते. ड्रायड्रंक्‍स या आजारामुळे आजारग्रस्त असणारी व्यक्‍ती मद्यप्राशन केल्यानंतर जशी वागते तशीच मद्यपान न करताही वागते. गोव्यात या दोन्ही आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षण डॉ. पाटील यांनी नोंदविले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Increase in the number of diseases caused by alcoholism