मुंबईत पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवा - नितीन गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 15 October 2020

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाचे उदाहरण देऊन गडकरींनी म्हटले आहे, की अतिपाऊस आणि पुरामुळे पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या डांबरी रस्त्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे मुंबईतील सर्व रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात यावे. 

नवी दिल्ली - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि वर्षानुवर्षे या संकटातून जाणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने रस्त्यांचे डांबरीकरण, पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविणे, सांडपाण्याचा निचरा करण्याची यंत्रणा सक्षम करणे व पाणी फेरवापर प्रकल्पांची वेगाने उभारणी करणे यासारखे उपाय राबवावेत, अशी सूचना केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईतील पुराची समस्या सोडवण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेला जबाबदारी देण्यात यावी असेही त्यांनी सुचविले आहे. गडकरी यांनी हे पत्र ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य नेत्यांनाही पाठविले आहे. मुंबईतील पावसाळी उपाययोजनांबाबत सूचना करणाऱ्या या पत्रात गडकरींनी मुंबईतील दरवर्षीची पुराची समस्या सोडविण्यासाठी समन्वित प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्याला केंद्रीय नगरविकास मंत्रालयाची मदत मिळेलच, असाही शब्द दिला आहे. पत्रात म्हटले, की सांडपाणी व अन्य टाकाऊ पाण्यावर फेरप्रक्रिया करून त्यातून वापरण्यायोग्य पाणी व मिथेन गॅसची निर्मिती करता येऊ शकते. पुराचे व ड्रेनेजचे पाणी ठाण्याकडे वळवून तेथे ते साठवता येईल व त्यावर फेरप्रक्रिया केल्यावर ते नगर-नाशिकमधल्या दुष्काळी भागातील शेतीसाठीही वापरता येईल. कॉलन्यांमध्ये पाणी फेरवापर यंत्रणा उभारल्या तर महापालिकेचे लाखो रुपये वाचतील असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाचे उदाहरण देऊन गडकरींनी म्हटले आहे, की अतिपाऊस आणि पुरामुळे पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या डांबरी रस्त्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे मुंबईतील सर्व रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात यावे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘ मुंबईत पुराच्या संकटामुळे दरवर्षीच इमारतींची पडझड, जीवितहानी, वित्तहानी, रस्त्यांचे नुकसान ही संकटे उद्भवतात. हे संकट टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.’’ 
नितीन गडकरी, रस्ते आणि महामार्ग मंत्री 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase the quality of infrastructure in Mumbai says nitin gadkari