भारत करतो १२ अब्ज डॉलर किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य निर्यात; राजीव चंद्रशेखर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajeev Chandrasekhar Electronics Technology Information

भारत करतो १२ अब्ज डॉलर किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य निर्यात; राजीव चंद्रशेखर

नवी दिल्ली : देशात वापरले जाणारे ९७ टक्के मोबाईल फोन भारतातच बनविण्यात आलेले असतात असा दावा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केला.

ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केलेल्या भारतीय तंत्रज्ञान, नावीन्य परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, २०१४ मध्ये देशातील आयात मोबाईल फोनचे प्रमाण ९२ टक्के होते. आज मात्र भारतात बनविण्यात आलेल्या मोबाईल फोनचे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत गेले आहे. आजघडीला आपण १२ अब्ज डॉलर किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य निर्यात करतो.

चंद्रशेखर हे कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचेही राज्य मंत्री आहेत. त्यांनी सांगितले की, भारत हे सेमीकंडक्टर आणि मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी गुणवत्ता आणि नावीन्याचे केंद्रस्थान बनले आहेच. याशिवाय नावीन्यपूर्ण अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे.

२०१४ नंतर सेमीकंटक्टर क्षेत्रात देशाने लक्षणीय प्रगती साध्य केली आहे. त्याचा विस्तार करण्यासाठीचा आराखडा तयार केला जात आहे. आज ड्रोनसह बहुतेक क्षेत्राच्या पूरक अर्थव्यवस्थेमध्ये स्टार्ट-अप अविभाज्य घटक बनले आहेत, जे नव्या भारताच्या निर्मितीसाठी सरकारने आखलेल्या ध्येयधोरणाचे अविभाज्य भाग आहेत.

जागतिक पुरवठा साखळी कार्यक्षम आणि रास्त पद्धतीने उपलब्ध असण्याची गरज आहेच, पण त्यास मूल्ये आणि विश्वासाचीही जोड असायला हवी. इंटरनेट क्षेत्राचे भविष्य घडविण्यासाठी लोकशाही देशांना पुढाकार घ्यावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

नवे डाटा संरक्षण विधेयक अत्यंत सोपे आणि आधुनिक पद्धतीचे असेल. भारतात डाटा सुरक्षितता आणि गोपनीयता हे मूलभूत हक्क आहे. या हक्कांची मान्यता आणि जतन करण्याच्यादृष्टीने हे विधेयक प्रागतिक असेल. पुढील वर्षी फेब्रुवारी ते संसदेत मांडण्यात येईल.

- राजीव चंद्रशेखर, आयटी राज्य मंत्री