
मतदार यादीतील बनावट मतदारांवरून निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज इंडिया आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आहे. हा मोर्चा पोलिसांनी अडविल्याने खासदारांनी ठिय्या मांडला. दरम्यान पोलिसांनी राहुल गांधी, संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. या मोर्चात इंडिया आघाडीतील 25 घटक पक्ष सहभागी झाले. मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, प्रियांका गांधी आदींसह जवळपास 300 खासदार मोर्चात सहभागी झाले आहेत.
ताब्यात घेतलेल्या खासदारांना संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. संसद भवन परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत.आम्हाला स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी पाहिजे, 'एक व्यक्ती एक मत' यासाठी आमची लढाई असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले तर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने लढाई लढणार आहोत. दरम्यान 30 खासदारांना निवडणूक आयोगात भेटीसाठी परवानगी देण्यात आली आहे. जास्त खासदार आल्याने मोर्चा अडविण्यात आला असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.