भारतातून 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्दच, फक्त या विमानांना परवानगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला असून DGCA ने सर्व इंटरनॅशनल कमर्शियल पॅसेंजर फ्लाइट 31 जुलैपर्यंत रद्द करण्यात आल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला असून DGCA ने सर्व इंटरनॅशनल कमर्शियल पॅसेंजर फ्लाइट 31 जुलैपर्यंत रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. शुक्रवारी डीजीसीएकडून याबाबात माहिती देण्यात आली. या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, इंटरनॅशनल कार्गो आणि डीजीसीएकडून सूट देण्यात आलेल्या विमानांच्या उड्डाणावर हा नियम लागू नाही. याआधी इंटरनॅशनल कमर्शियल पॅसेंजर फ्लाइट्स 15 जुलैपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. 

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं होतं की, आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरु होण्यासाठी भारत इतर देशांवर अवलंबून आहे. नव्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करण्याचा निर्णय तेव्हा घेतला जाईल ज्यावेळी देश विदेशातील प्रवाशांना इथं लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येतील किंवा हटवण्यात येतील. विमाने उतरवण्यासाठी परवानगी इतर देशांकडून मिळणे गरजेचे आहे. भारताने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर 25 मे रोजी देशांतर्गत उड्डाणे सुरु केली आहेत. 

हे वाचा - लडाखमधील मातीचा छोटासा कणही भारताचा अभिन्न अंग- नरेंद्र मोदी

हरदीप सिंग पुरू यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 10 टक्क्यांहून कमी आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत आहेत. कारण फक्त आपल्याच नागरिकांना देशात येण्याची परवानगी आहे. परदेशी नागरिकांना देशात येण्यावर पूर्ण बंदी आहे. अनेक देश असेही आहेत ज्यांनी काही इतर देशांमधून येण्यास परवानगी देत आहेत. मात्र त्यासाठी क्वारंटाइनची अट आहे. 

भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र वंदे भारत मिशन अंतर्गत जगभरात इतर देशांमध्ये एअर इंडिया आणि इतर विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांद्वारे 6 मे 2020 पासून आतापर्यंत 66500 लोकांना देशात आणलं आहे.

हे वाचा - मोदींच्या मनात नेमकं काय सुरुय? चीनला दणका देण्याचा विचार?

भारतात गेल्या 24 तासात सर्वाधिक 20 हजार 903 रुग्ण आढळले आहेत. तर देशात एका दिवसात 379 जणांचा मृत्यूही झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 25 हजार 544 इतकी झाली आहे. देशात सध्या 2 लाख 27 हजार 439 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असून देशात कोरोनामुक्त होऊन 3 लाख 79 हजार 892 जण घरी परतले आहेत. आतापर्यंत देशातील 18213 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india Ban on international commercial passenger flights till 31 july