फिंगर आठपर्यंत भारताचीच हद्द; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा

फिंगर आठपर्यंत भारताचीच हद्द; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा

नवी दिल्ली - चीनला लागून असलेल्या सीमेवर भारतीय हद्द फिंगर चारपर्यंत आहे हे विधान पूर्णतः खोटे आहे. फिंगर आठपर्यंत भारताची हद्द असून तेथपर्यंत गस्त घालण्याचा भारताचा अधिकार अबाधित आहे, असे संरक्षण मंत्रालयाने आज स्पष्ट केले. तसेच पूर्व लडाख भागातील सीमेचे आणि देशाच्या स्वाभिमानाचे रक्षण झाले असताना या यशावर संशय घेणारे सैन्यदलांचा अपमान करत आहेत, अशी टिपणीही केली आहे. 

सैन्य माघारीबाबत भारत आणि चीनमध्ये झालेल्या सहमतीवरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भारतीय भूभाग चीनला देऊन टाकल्याचा आरोप केला. तसेच ताबा रेषा फिंगर चारपर्यंत असताना फिंगर तीनपर्यंत माघार घेणे हा पंतप्रधानांचा भेकडपणा असल्याचाही हल्ला केला आहे. त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने निवेदनाद्वारे खुलासा करताना राहुल गांधींचे नाव न घेता, सैन्य माघारीबाबत खोडसाळ आणि दिशाभूल करणारी माहिती पसरविली जात असल्याचा टोला लगावला. तर, परराष्ट्र मंत्रालयानेही या मुद्द्यावर संरक्षण मंत्र्यांचे संसदेतील वक्तव्य आणि संरक्षण मंत्रालयाचे निवेदन पुरेसे असल्याचे म्हटले. 

संरक्षण मंत्रालयाने याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पॅन्गाँग त्सो परिसरात सुरू झालेल्या सैन्य माघारीबाबत प्रसारमाध्यमे, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खोडसाळ आणि दिशाभूल करणारी माहिती पसरविली जात आहे. त्यामुळे गैरसमज पसरविणाऱ्या माहितीला आळा घालण्यासाठी सत्य परिस्थिती मांडणे आवश्यक आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी संसदेमध्ये या आधीच सत्य परिस्थिती मांडली असून संरक्षण मंत्रालय याचा पुनरुच्चार करत आहे. 

भारतीय हद्द फिंगर चार पर्यंतच आहे, हे विधान पूर्णपणे खोटे असून ही हद्द भारतीय नकाशामध्ये स्पष्ट आहे. १९६२ पासून चीनचा अवैध ताबा असलेला ४३००० चौरस किमीपेक्षा अधिक भूभाग त्यात समाविष्ट आहे, याकडे संरक्षण मंत्रालयाने लक्ष वेधले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा फिंगर चारजवळ नव्हे तर, फिंगर आठपर्यंत असल्याने भारताने सातत्याने फिंगर आठपर्यंत गस्तीचा हक्क अबाधित ठेवला आहे. 

पॅन्गाँग त्सो सरोवराच्या उत्तर भागात दोन्ही बाजूच्या स्थायी चौक्या आहेत. भारतीय बाजूकडे फिंगर तीनजवळ धनसिंग थापा चौकी तर चिनी बाजूकडे फिंगर आठच्या पूर्वेला एक चौकी आहे. विद्यमान करारानुसार दोन्ही बाजूकडून सैन्य तुकड्यांना पुढे सरकण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून स्थायी चौक्यांवर तैनात सैन्य जैसे थे आहे. या करारामध्ये भारताने कोणताही भूभाग दिलेला नाही. उलट, ताबारेषेचा आदर राखताना त्यात एकतर्फी बदलाचा प्रयत्न रोखला आहे. 

अन्य मुद्द्यांवर लवकरच तोडगा 
हॉट स्प्रिंग्ज आणि गोगरा या भागात चिनी सैन्याची माघार नाही, असाही दावा राहुल गांधींनी केला होता. यावरही संरक्षण मंत्रालयाने खुलासा करताना म्हटले, की हॉट स्प्रिंग्ज, गोगरा आणि देप्सांग या भागात अन्य समस्या असून पॅन्गाँग त्सो भागात सैन्य माघार संपल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढला जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com