चीनकडून सीमेवर जाणीवपूर्वक तणाव;संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ४४ पुलांचे लोकार्पण 

पीटीआय
Monday, 12 October 2020

२८६ कोटी खर्चुन उभारलेल्या या पुलांचे बांधकाम हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि केद्रशासित प्रदेश जम्मू काश्‍मीर आणि लडाख येथे झाले आहे. 

नवी दिल्ली - चीनकडून जाणीवपूर्वक ठरवून सीमेवर तणाव निर्माण केला जात असून यासाठी चीनने मोहिमच उघडली आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले. सात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सीमा रस्ता संघटना (बीआरओ)कडून बांधण्यात आलेल्या ४४ पुलांचे लोकार्पण आज केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. या वेळी ते बोलत होते. राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील नेचिफू बोगद्याच्या कामाचेही भूमिपूजन केले. २८६ कोटी खर्चुन उभारलेल्या या पुलांचे बांधकाम हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि केद्रशासित प्रदेश जम्मू काश्‍मीर आणि लडाख येथे झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजनाथसिंह म्हणाले, की सध्या उत्तर आणि पूर्व सीमेवरची स्थिती सर्वांनाच ठाऊक आहे. अगोदर पाकिस्तान आणि आता चीनकडून जाणीवपूर्वक सीमेवर वाद उकरून काढला जात आहे. या देशांदरम्यान आपल्या ७ हजार किलोमीटरच्या सीमा असून तेथे सतत तणावाचे वातावरण असते. सध्याच्या काळात देशातील प्रत्येक क्षेत्रावर कोविडचा परिणाम झाला आहे. मग कृषी असो किंवा अर्थव्यवस्था असो, उद्योग असो किंवा संरक्षण यंत्रणा असो. या सर्वांवर सखोल परिणाम झाले आहेत. परंतु अनंत अडचणी असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली देश या संकटाचा सामना करत आहेच, त्याबरोबर सर्व क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडत आहेत. एकाचवेळी ४४ पुलांचे लोकार्पण करणे हा देखील एक विक्रम आहे. या पुलाच्या माध्यमातून सात राज्य तसेच केंद्रशासित राज्यांच्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. रोहंताग अटल बोगदा हे ते आदर्श उदाहरण आहे. हा बोगदा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच हिमाचल, जम्मू काश्‍मीर आणि लडाखचे जीवनमान उंचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बीआरओकडून बांधण्यात येणारे पूल, रस्ते आणि बोगदे हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेतच त्याबरोबर देशाच्या विकासासाठी देखील मोलाचे योगदान देणारे आहेत. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे उभारले पूल 
जम्मू काश्‍मीर: १० 
लडाख: ८ 
हिमाचल प्रदेश: २ 
पंजाब: ४ 
उत्तराखंड: ८ 
अरुणाचल प्रदेश: ८ 
सिक्कीम : ४ 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीमेजवळील पर्वतरांगा आणि दुर्गम भागात बीआरओकडून होणाऱ्या कामात अत्याधुनिक यंत्र आणि तंत्राचा वापर होत असल्याने गेल्या दोन वर्षात २२०० किलोमीटरहून अधिक रस्ते तयार झाले. त्याचबरोबर ४२०० किलोमीटरच्या रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात आले. 
राजनाथसिंह, संरक्षणमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china border dispute Defense Minister Rajnath Singh inaugurated the 44 bridges