India China Border Issue : सैन्य माघारीबाबत ठोस निष्कर्ष नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India and China
India China Border Issue : सैन्य माघारीबाबत ठोस निष्कर्ष नाही

भारत चीन सीमावाद : सैन्य माघारीबाबत ठोस निष्कर्ष नाही

नवी दिल्ली : ताबारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनदरम्यान काल (ता. १२) झालेल्या लष्करी पातळीवरील वाटाघाटींमधून सैन्य माघारीबाबत ठोस निष्कर्ष निघाला नाही. त्यामुळे गोगरा, हॉटस्प्रिंग भागातून चिनी सैन्याची माघार हा कळीचा मुद्दा बनला आहे. अर्थात, वादाच्या मुद्द्यांवर उभयमान्य तोडगा काढण्यासाठी संवाद सुरू ठेवण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविल्याने चर्चेच्या आणखी फेऱ्या अपेक्षित आहेत. (India China Border Issue)

भारत आणि चीन (India And China) दरम्यान कोअर कमांडर पातळीवरील वाटाघाटींची १४ वी फेरी काल चुशूल मोल्डो भागात चीनी हद्दीमध्ये झाली. तब्बल १३ तास चाललेली ही बैठक रात्री साडेदहाच्या आसपास संपली. १४ व्या कोअरचे नवे प्रमुख लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. याआधी ऑक्टोबरमध्ये झालेल्या वाटाघाटी कोणत्याही तोडग्याविना संपल्यानंतर दोन्ही देशांकडून आक्रमक वक्तव्ये झाली होती.

हेही वाचा: पुणे : मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

यापार्श्वभूमीवर कालच्या बैठकीकडून सकारात्मक अपेक्षा होती. बैठकीत भारताने चीनचा नवा सीमा कायदा आणि चीनच्या ताब्यात असलेल्या अक्साई चीनमध्ये लष्करी कुमक वाढवून तणाव निर्माण केल्याचा मुद्दा उपस्थित केल्याचे समजते. गोगरा हॉटस्प्रिंग भागातील तणावबिंदूवरून चीनने सैन्य माघारी बोलवावे. तसेच देप्सांग आणि देम्चोक भागातील तणाव कमी व्हावा याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, या माघारीबाबत चीनकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने या बैठकीतून भारताच्या हाती फारसे लागले नाही.

संरक्षण मंत्रालयाने या वाटाघाटींबद्दल आज एक निवेदन जारी केले. ताबारेषेच्या पश्चिम भागामधील तणाव निवळण्यासाठी खुलेपणाने साधकबाधक चर्चा झाली. उर्वरित मुद्द्यांवर लवकरात लवकर उभयमान्य तोडगा काढण्यासाठी संपर्कात राहण्याचे आणि लष्करी तसेच राजनैतिक पातळीवर संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही बाजूंची सहमती झाली असून पुढील चर्चेची फेरी लवकरच घेतली जाईल.

हेही वाचा: यूपीत 2017 च्या तुलनेत भाजपला मोठा विजय मिळेल - केशव प्रसाद मौर्य

शांतता-स्थैर्य राखण्यावर सहमती

आतापर्यंतच्या (वाटाघाटींमधील) फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यावर त्याचप्रमाणे ताबारेषेच्या पश्चिम भागामध्ये हिवाळ्यातही शांतता आणि स्थैर्य राखण्यावर देखील दोन्ही बाजू सहमत झाल्याचे या निवेदनात संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. पॅंगॉंग त्सो सरोवराच्या दोन्ही टोकांना जोडणारा पूल चीन बांधत असल्याच्या बातम्या झळकल्यानंतर भारताने यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली होती.

चीनने बेकायदा बळकावलेल्या भागात हे बांधकाम सुरू असल्याचे भारताने फटकारले होते. तर, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनीही काल सीमेवर तणावासाठी चीनला जबाबदार धरताना, मर्यादित स्वरूपाच्या सैन्य माघारीमुळे संघर्षाचा धोका कायम असल्याचा इशारा दिला होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ChinaIndiaBorder
loading image
go to top