राष्ट्रीय सुरक्षेचा केंद्राकडून खेळखंडोबा | India China Border | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India China Border
राष्ट्रीय सुरक्षेचा केंद्राकडून खेळखंडोबा

राष्ट्रीय सुरक्षेचा केंद्राकडून खेळखंडोबा

नवी दिल्ली : चीनने पुन्हा सीमावाद उकरून काढत नव्या वर्षाच्या प्रारंभी गलवान खोऱ्यात झेंडा फडकावल्याने भारतात राजकीय (Politics) आरोप सुरू झाले. मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा चालविला असून चीनला भारतीय सीमेबाहेर कधी घालवणार असा सवाल काँग्रेसने केला. भारतीय आणि चीनी सैनिकांच्या हिंसक झटापटीमुळे चर्चेत आलेल्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी झेंडा लावत एकही इंच भूभाग न सोडण्याचा इशारा देणारा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.

यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी ट्विट करून पंतप्रधान मोदींना आता तरी मौन सोडा, असे खोचक आवाहन केले होते. गलवानमध्ये आपला तिरंगाच शोभतो. चीनला प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असेही राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी सरकारवर हल्ला चढवला. मोदी सरकार राष्ट्रीय सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाचा खेळखंडोबा करत आहे. मोदी दुबळे पंतप्रधान आहेत. चीनने दुस्साहस करून झेंडा फडकावला.

हेही वाचा: पुणे : महापालिका सोमवारपासून सुरु करणार गुंठेवारीची नोंदणी

गलवानच्या घटनेनंतर सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे म्हटले होते. तर मग ऑक्टोबरपर्यंत चीनशी वाटाघाटींच्या १३ फेऱ्या कशासाठी झाल्या. दुर्दैवाने, सरकारने आपल्याच भूभागात बफर झोन बनविला आणि ताबारेषा बदलली. तरीही चीनने वादग्रस्त बिंदूंवरून माघार घेतली नसून भारताला चिथावणी दिली जात आहे, असा प्रहारही सुरजेवाला यांनी केला.

मोदी मौनात का ? चीनचे नाव कधी घेणार ? चीनला का घाबरतात? चीनचा कब्जा कधी हटविणार ? असे सवालही सुरजेवाला यांनी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India China Border
loading image
go to top