भारत-चीन संघर्ष मिटणार? पुढील आठवड्यात पुन्हा लष्करी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

चीनने काही ना काही मार्गाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन्ही देशांत तणावाचं वातावरण आहे. दोन्हीही देशांनी गलवान खोऱ्यात अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. चीनने काही ना काही मार्गाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. मात्र, चीनच्या या साऱ्या कारवायांना भारताने जशासतसे उत्तर दिले आहे. या साऱ्या धुमश्चक्रीमुळे दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाचे वातावरण कायम आहे. अशातच दोन्ही देशांतील लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी बैठकाही घडत आहेत. लवकरात लवकर प्रश्न मार्गी निघून तणावाचे वातावरण नष्ट करण्यासाठी पुढील आठवड्यात सातवी बैठक होणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पूर्व लडाखमध्ये होणारी ही सातवी बैठक आहे. 

याआधी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. यामुळे, सीमेवरील तणाव टिपेला पोहोचला होता. या संघर्षात 20 भारतीय जवान शहिद झाले होते. यावर भारताने आपला संताप व्यक्त करुन चीनच्या एकूण वागणुकीवर आणि भुमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र, तरीही चीनकडून सातत्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न होत आहेत. यामुळे कडाक्याच्या थंडीतही लडाख प्रदेशात दोन्ही बाजूचे सैन्य सज्ज होऊन बसले आहे. 

हेही वाचा - कोरोनाग्रस्त ट्रम्प यांच्यासाठी येणारे 48 तास महत्वाचे; चीफ ऑफ स्टाफ म्हणाले चिंताजनक परिस्थिती

मागच्याच महिन्यात पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या पुर्व भागात चीनी सैन्याने घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चीनी सैन्याचा हा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला होता. यानंतर भारत-चीन सीमेवरील तणाव हा वाढतच गेला. गलवान खोऱ्यातील या सगळ्या रक्तरंजित संघर्षानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी म्हणून दोन्ही देशात लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहे. या चर्चेच्या आतापर्यंत सहा फेऱ्या पुर्ण झाल्या असून आता सातवी फेरी लडाखमध्ये 12 ऑक्टोबरला होणार आहे. आपापले सैन्य मागे घेण्याविषयी या दोन्ही देशांत चर्चा होऊ शकते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china Conflict military standoff between commander level talks