भारताचा चीनला जबरदस्त शह; सहा टेकड्यांवर मिळवला ताबा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 20 September 2020

पूर्व लडाखच्या ताबा रेषेवर भारताने चीनला जबरदस्त शह देताना मागील तीन आठवड्यांमध्ये सहा नव्या टेकड्यांवर कब्जा केला आहे.

नवी दिल्ली- पूर्व लडाखच्या ताबा रेषेवर भारताने चीनला जबरदस्त शह देताना मागील तीन आठवड्यांमध्ये सहा नव्या टेकड्यांवर कब्जा केला आहे. भारताच्या जवानांनी २९ ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही सहा नवी ठिकाणे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली . मगर हिल, गुरंग हिल, रेशेन ला, रेझांग ला आणि फिंगर चार जवळील चीनच्या तळांवर जिथून सहज नजर ठेवता येते अशी काही ठिकाणे भारताने ताब्यात घेतली आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका? व्हाईट हाऊसमध्ये पाठवलं विषाचं पाकिट

मागील काही दिवसांपासून चीनचा या टेकड्यांवर डोळा होता. पॅंगॉंग सरोवराच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतच्या भागावर चीनने याआधीही कब्जा करण्याचा प्रयत्न केला असून यातूनच सीमेवर तीनवेळा गोळीबाराचा प्रसंग घडला होता. भारतीय जवानांनी ताब्यात घेतलेल्या टेकड्या भारताच्याच हद्दीत असून या भागांतून चीनच्या हालचाली सहज टिपता येतात. रणनितीकदृष्ट्या विचार केला तर सध्या चीनचे लष्कर हे अधिक उंचावरील टेकड्यांवर असून त्यांना तिथून भारताच्या हद्दीमध्ये काय सुरू आहे, यावर लक्ष ठेवता येते. या टेकड्या भारताने मिळवल्याने उभय देशांचे सैन्य ताबारेषेवर समोरासमोर उभे ठाकले आहे.

दोवाल यांचे लक्ष

भारताच्या आक्रमक रणनीतीनंतर चीनने या भागातील फौजफाटा आणखी वाढविला असून चीनने येथे तीन हजार सैनिक तैनात केले आहेत. चीनने काही दिवसांपूर्वी या भागामध्ये घुसखोरी केली होती. चीनला त्यांच्याच हद्दीत रोखण्यासाठी भारतानेही आक्रमक रणनितीचा अवलंब केला आहे. खुद्द देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे या भागातील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भविष्यामध्ये चीनने आगळीक केल्यास त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचे नियोजन भारताने आखले आहे.

मास्क न लावल्यामुळे पाचशेचा दंड; वकीलाने मागितली दहा लाखांची नुकसानभरपाई

दरम्यान, 15 जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान रक्तरंजित संघर्ष झाला होता. तेव्हापासून उभय देशांमध्ये तणाव आहे. दोन्ही देशांनी सीमा भागात आपले सैनिक तैनात केले आहेत. भारताने आक्रमकपणा दाखवत चिनी कंपनीच्या अनेक अॅप्सवर बंदी आणली आहे. यामुळे चीन बिथरला असून सीमा भागात हालचाली वाढवल्या आहेत. भारताने प्रत्युत्तरासाठी पूर्ण तयारी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india controls six hills on china border