ब्रेकिंग न्यूज : प्रतिक्षा संपली; DCGI कडून Covishield आणि Covaxin ला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

याआधी भारतातील तज्ज्ञांच्या समितीने या दोन्ही लशींच्या वापरासाठी मंजूरी दिली होती.

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर झायड्स कॅडिलाची लस 'झायकोव्ह-डी' च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची पत्रकार परिषद आज दुपारी 11 वाजता पार पडली. DCGI चे बी जी सोमानी यांनी ही घोषणा केली. याआधी भारतातील तज्ज्ञांच्या समितीने या दोन्ही लशींच्या वापरासाठी मंजूरी दिली होती. नव्या वर्षात 1 जानेवारी रोजी सीरमच्या कोविशिल्ड लशीला मान्यता देण्यात आली होती तर 2 जानेवारी रोजी कोव्हॅक्सिनला तज्ज्ञांकडून ही मान्यता देण्यात आली होती. 

याबाबत बोलताना DCGI चे बी जी सोमानी यांनी म्हटलं की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थोडेदेखील धोकादायक असलेलं आम्ही काहीही मंजूर करणार नाही. या लशी 100 % सुरक्षित आहेत. सौम्य ताप येणे, वेदना होणे आणि ऍलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य असतात. जर यावरुन लोक असंयम दाखवत असतील तर हे चुकीचं आहे. 

याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारताचे अभिनंदन केलं आहे. मोदींनी म्हटलंय की, आवेशपूर्ण लढ्याला अधिक मजबूत करण्यासाठीचे हे निर्णायक वळण आहे. DCGI चे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींना मान्यता दिली आहे. यामुळे निरोगी आणि कोविड-मुक्त देशाच्या मार्गाचा वेग वाढला आहे. आमच्या साऱ्या मेहनती वैज्ञानिक आणि संशोधकांचे मन:पूर्वक अभिनंदन.

याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पूनावाला यांनी ट्विट करत आभार व्यक्त केलेत. त्यांनी मिळालेल्या मंजूरीबाबत आनंद व्यक्त करत नववर्षाच्या सदिच्छा दिल्या आहेत. 

 

देशातील तीन लस निर्मिती कंपन्यांनी लशीच्या आपात्कालीन मंजुरीसाठी अर्ज केले होते. यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाद्वारे निर्माण केली जाणारी कोविशिल्ड आणि भारत बायोटेक आणि आयसीएमआर ICMR द्वारे विकसित कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. फायझर-बायोएनटेकच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. फायझरने आपला डाटा देण्यासाठी तज्ज्ञ समितीला आणखी काही दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर फायझरच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Corona Vaccination Covaxin Covisheild get approval from DGCI