स्थिती गंभीर! पहिल्यांदाच भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखाजवळ

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 September 2020

कोरोनाबाधितांच्या संख्येत देश नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे

नवी दिल्ली-  भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत देश नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. गेल्या २४ तासात देशात 96 हजार 457 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे, तर 1357 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 76 हजार 277 पेक्षा अधिक जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा  45 लाख 52 हजार 21 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 35 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आणि सध्या 9 लाख 43 हजार 480 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. 

पोस्टातील 'या' योजनेत करा गुंतवणूक आणि कमवा लाखो रुपये!

देशातील राज्यांची कोरोनाची आकडेवारी पाहिली तर, महाराष्ट्र कोरोनाने सर्वाधिक प्रभावित राज्य ठरले आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्रात 23 हजार 446 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून 448 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एका दिवसात राज्यात 14 हजार 253 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 9 लाख 90 हजार 795 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 7 लाख 715 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 61 हजार 432 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 28 हजार 282 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य प्रशासनाने दिली आहे.   

महत्वाची बाब म्हणजे देशात कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढताना दिसतंय. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 11 लाख 63 हजार 542 चाचण्या झाल्या. कालच्या चाचण्या मिळून भारतात आतापर्यंत 5 कोटी 40 लाखांपेक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत.  जगाचा विचार केला तर आतापर्यंत 2.8 कोटींच्या वर लोकांना कोरोनाची बाधा झाली असून जवळपास 1.9 कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणेकरांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन; रोजच्या तपासणीत 28 टक्के...

जगभरात कोरोनाचे अक्षरश: थैमान घातले आहे. अमेरिकत सर्वाधिक कोरोनाबाधित असून ६5 लाखांच्या जवळ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. भारत कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावित दुसरा देश असून ब्राझीलचा क्रमांक दुसरा लागतो. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ४२.२५ लाखांच्या जवळ आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने एकूण कोरोनाग्रस्त संख्येच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकले होते. देशातील रुग्ण वाढीचा दर कामय राहिल्यास भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकण्याची शक्यता आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india corona virus update patients near 1 lakh