भारतातील कोरोना दिवाळीपर्यंत येईल आटोक्यात, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली माहिती

Dr.-harsh-Vardhan
Dr.-harsh-Vardhan

भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. ऑगस्टच्या महिन्याच्या सुरवातीपासूनच भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 7 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत 14 लाखांच्या वर कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. जगभरात सध्या कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरु असून लवकरच ती बाजारात येईल, अशी चिन्हे दिसत आहेत. पण जोपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कोरोनाला लगाम लावणं अवघड दिसतंय. या पार्श्वभूमीवरच दिवाळीपर्यंत आपण कोविड 19च्या साथीला मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणू अशी आशा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर बोलताना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन पुढे म्हणाले, 'आशा आहे की येत्या काही महिन्यांत आपण दिवाळीपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवू. अनंतकुमार फाउंडेशनतर्फे आयोजित 'नेशन फर्स्ट' वेब सेमिनारमध्ये केंद्रीय मंत्री हर्षवर्धन बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की,डॉ. देवी प्रसाद शेट्टी आणि डॉ.सी.एन. मंजुनाथा सारख्या तज्ञांना कदाचित हे मान्य होईल की काही काळानंतर कोरोना ही पूर्वीच्या इतर विषाणूंप्रमाणेच एक सामान्य समस्या असेल.तसेच या विषाणूने आम्हाला बरंच काही शिकवलं आहे आणि आपण सर्वांनीच आपल्या जीवनशैलीबद्दल अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूवरची लस येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

देशात आतापर्यंत  covid19india.org च्या माहितीनुसार ३६लाख २४ हजार ६१३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी २७लाख ७२ हजार ९२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यापैकी काल एका दिवसात भारतात एकूण ६०हजार ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही ६४ हजार ६४६ झाली असून काल एका दिवसात कोरोनामुळे ९६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही आता ७ लाख ८४ हजार १७९ एवढी झाली आहे. वरील आकडेवारी ही ३१ ऑगस्टच्या सकाळी ११ वाजेपर्यंतची आहे.

दरम्यान, भारतात आतापर्यंत एकूण ४.२ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये पॉजिटिव्हिटी रेट हा ८.६ टक्के एवढा आहे. तर रिकव्हरी रेट आता ७६.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. भारत हा सध्या कोरोनाग्रस्तांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असून भारताच्या पुढे अमेरिका पहिल्या स्थानावर तर ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ही अशीच वाढत राहिली. तर भारत लवकरच कोरोनाग्रस्तांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com