राहुल गांधींच्या टीकेनंतर मोदी सरकारने वेबसाइटवरून कागदपत्रे केली डिलीट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

राहुल गांधींनी त्या कागदपत्रांचा दाखला देत म्हटलं होतं की, पंतप्रधान खोटं का बोलत आहेत? यानंतर संरक्षण मंत्रालयाने कागदपत्रे हटवली आहेत. 

नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये चीन आणि भारत यांच्यात तणावाचे वातावऱण आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. राहुल गांधींच्या टीकेनंतर आता संरक्षण मंत्रालयाने चीनच्या घुसखोरीबाबतची कागदपत्रे संकेतस्थळावरून डिलीट करण्यात आली आहेत. राहुल गांधींनी त्या कागदपत्रांचा दाखला देत म्हटलं होतं की, पंतप्रधान खोटं का बोलत आहेत? यानंतर संरक्षण मंत्रालयाने कागदपत्रे हटवली आहेत. या कागदपत्रांमध्ये अधिकृतपणे चीनने मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये भारतीय भूभागावर अतिक्रमण केल्याचा उल्लेख होता. आता ही कागदपत्रे डिलीट केल्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 

गेल्या महिन्यात गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. तेव्हा पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, भारतात कोणीही घुसलं नव्हतं आणि आताही कोणी घुसलेलं नाही. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावरूनच ते खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीमध्ये भारताचे 21 जवान शहीद झाले होते. तर चीनचे 45 हून अधिक सैनिक मारले गेले होते. चीनने त्यांचे सैनिक मारले गेल्याचं स्वीकारलं होतं मात्र अधिकृतपणे यावर त्यांनी काहीच माहिती दिली नव्हती. 

हे वाचा - काँग्रेसला मोठा दिलासा; राजस्थानमध्ये सरकार वाचणार?

संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर चीनच्या हल्ल्याशी संबंधत कागदपत्रे हटवल्यानंतर राहुल गांधीनी आणखी एक ट्विट करत थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले की,  चीनविरुद्ध उभा राहण्याचं विसरूनच जा. भारताच्या पंतप्रधानांमध्ये चीनचं नाव घेण्याचंही धाडस नाही. चीन आपल्या भागात घुसल्याचं नाकारणं आणि वेबसाइटवरून कागदपत्रे हटवल्यानं सत्य बदलणार नाही. 

हे वाचा - Bairut Blast : भारतातही बैरूतसारख्या स्फोटाचा धोका

काय होतं कागदपत्रांमध्ये?
संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी संकेतस्थळावर अपलोड केलेल्या कागदपत्रांमध्ये चीनचे सैनिक भारतात घुसल्याचं म्हटलं होतं. पहिल्यांदाच असा अधिकृत उल्लेख कागदपत्रांमध्ये कऱण्यात आला होता. कागदपत्रांमध्ये लिहिलं होतं की, चीनकडून 17 - 18 मे रोजी कुगरांग नाला, गोगरा आणि पेगोंग सोच्या उत्तर भागावर अतिक्रमण करण्यात आलं होतं. 

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केल्यास भारत त्यासाठी अतिक्रमण हा शब्द वापरतो. मात्र 5-6 मे रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर भारताने कोणत्याच कागदपत्रांमध्ये अतिक्रमण झाल्याचं म्हटलं नव्हता. तेव्हा म्हटलं होतं की, सध्याचा तणाव बराच काळ सुरू राहू शकतो. जी परिस्थिती निर्माण होत आहे त्यावर तात्काळ कारवाईची गरज पडू शकते.

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india defance ministry delete document related china transgression