
Rajnath Singh News : भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन २०२४-२५ मध्ये १ लाख ५० हजार ५९० कोटींच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी ही माहिती दिली. मागील आर्थिक वर्षात १.२७ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत संरक्षण उत्पादनात सुमारे १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे संरक्षण उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले असून, २०२४-२५ आर्थिक वर्षात वार्षिक संरक्षण उत्पादन १,५०,५९० कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर वाढले आहे."
संरक्षणमंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मागील आर्थिक वर्षात १.२७ लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाच्या तुलनेत आणि २०१९-२० पासून ९० टक्क्यांनी आश्चर्यकारक वाढ झाली आहे. तेव्हा हा आकडा ७९,०७१ कोटी रुपये होता."
केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ''संरक्षण उत्पादन विभाग आणि सर्व भागधारक, ज्यात सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स आणि संरक्षण क्षेत्रातील खासगी उद्योगांचा समावेश आहे, संरक्षण उत्पादन क्षेत्रात हे यश मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी 'सामूहिक प्रयत्नांचे' कौतुक केले आणि ते 'ऐतिहासिक यश' म्हटले. संरक्षणमंत्र्यांनी म्हटले की, "संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढती प्रगती ही भारताच्या मजबूत होत असलेल्या संरक्षण औद्योगिक पायाचे स्पष्ट संकेत आहे."