
जगातील सर्वांत मोठी व बळकट लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही निर्देशांकाच्या २०२०मधील सूचीत दोन क्रमांकाने घसरण झाली आहे. यादीत भारत ५३ व्या स्थानी आहे.
नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी व बळकट लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही निर्देशांकाच्या २०२०मधील सूचीत दोन क्रमांकाने घसरण झाली आहे. यादीत भारत ५३ व्या स्थानी आहे.
‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट’(इआययू)ने २०२० मधील लोकशाही निर्देशांकाची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. लोकशाही मूल्यांकडे पाठ आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याविरोधात कारवाईमुळे भारताची क्रमवारीत घसरगुंडी झाली आहे, असे ‘इआययू’ने ‘डेमोक्रसी इन सिकनेस अँड इन हेल्थ’ या शीर्षकाच्या अहवालात म्हटले आहे. मात्र शेजारील देशांपेक्षा भारताचा क्रमांक वरचा आहे. भारताला २०१९मध्ये ६.९ गुण होते. २०२०मध्ये ते कमी होऊन ६.६१ झाले. यातून भारतीय लोकशाही चित्र स्पष्ट होते. लोकशाही मूल्यांवर भारतात सध्या मोठे दडपण असल्याने भारताची कामगिरी खालावली असल्याचे यात म्हटले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘इआययू’च्या ताज्या निर्देशांकांत नॉर्वेला प्रथम स्थान मिळाले आहे. यानंतर आइसलँड, स्वीडन, न्यूझीलंड आणि कॅनडा यांचा क्रमांक आहे. या यादीत १६७ देशांचा समावेश असून २३ देशांचा समावेश पूर्ण लोकशाही, ५२ देश सदोष लोकशाही गटांत, ३५ देशातील मिश्र सत्तेत, ५७ हुकूमशाही देशांत असे वर्गीकरण केले आहे. भारताचा समावेश अमेरिका, ब्राझील, बेल्जियम आणि फ्रान्सबरोबर सदोष लोकशाही गटात आहे.
मोदी सरकारच्या धर्मवादावर टीका
‘‘भारत आणि थायलंड येथील अधिकारपदावरील व्यक्तींकडून लोकशाही मूल्यांकडे दुर्लक्ष होत असून नागरी स्वातंत्र्यावरही बंधने आणली जात आहे. यामुळेच जागतिक निर्देशांकात भारताचे स्थान घसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय नागरिकत्वाचा मुद्दा धर्माशी जोडल्याने देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का बसला आहे. सरकारच्या या धोरणावर अनेकांनी टीकाही केली असल्याचे नोंद या अहवालात म्हटले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सूचीतील निवडक देशांची क्रमवारी
१) नॉर्वे, २) आइसलँड, ३) स्वीडन, ४) न्यूझीलंड, ५) कॅनडा,
६) फिनलंड, ७) डेन्मार्क, ८) आयर्लंड, ९) ऑस्ट्रेलिया/ नेदरलँड, १४) जर्मनी, १६) ब्रिटन, २१) जपान, २४) फ्रान्स, २५) अमेरिका, ५३) भारत, ६८) श्रीलंका, ७६) बांगलादेश, ८४) भूतान, ९२) नेपाळ, १०५) पाकिस्तान, १२४) रशिया, १३९) अफगाणिस्तान, १४५) संयुक्त अरब अमिराती, १५६) सौदी अरेबिया, १६७ ) उत्तर कोरिया (सर्वांत शेवटचा क्रमांक).