esakal | संयुक्त राष्ट्रांत भारताचा दबदबा; PM मोदी भूषवणार UNSCचं अध्यक्षपद
sakal

बोलून बातमी शोधा

 Narendra modi

संयुक्त राष्ट्रांत भारताचा दबदबा; PM मोदी भूषवणार UNSCचं अध्यक्षपद

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : भारतासाठी एक अभिमानाची बाब आहे, ती म्हणजे आजपासून (१ ऑगस्ट २०२१) भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची धुरा सांभाळणार आहे. अर्थात या परिषदेचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार असून ते एक महिन्यासाठी या पदावर असतील. भारताच्या या दबदब्यामुळं पाकिस्तान आणि चीन या शेजारील देशांचं धाबं दणाणलं आहे.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलं की, "आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अर्थात UNSC च्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा परिषदेत हा आपला आठवा कार्यकाळ आहे. ७५ वर्षांहून अधिक वर्षात हे पहिल्यांदाच घडत आहे की, आपल्या राजकीय नेतृत्वानं सुरक्षा परिषदेतील कोणत्याही कार्यक्रमचं अध्यक्षपद भूषवण्यात रस दाखवला आहे. यावरुन हे दिसून येतं की, भारत आणि भारताच्या राजकीय नेतृत्वानं विदेश नीती उपक्रमांमध्ये सक्षमपणे काम केलं आहे."

इतर सदस्यांसोबत सहकार्य राखणार - एस. जयशंकर

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं की, "आपण १ ऑगस्टपासून संयुक्त राष्ट्रांतील सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद सांभाळणार आहोत. या दरम्यान, भारत अन्य सदस्यांसोबत सहकार्यानं काम करण्यासाठी बांधील आहे. भारत काय संयम, संवाद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा समर्थक राहिला असून भविष्यातही राहणार आहे. सुरक्षा परिषदेत भारताचा पहिला दिवस सोमवार, दोन ऑगस्ट हा असेल. या काळात भारत तीन प्रमुख क्षेत्रं सागरी संरक्षण, शांतीरक्षा आणि दहशतवाद रोखण्यासंबंधी विशेष कार्यक्रम मांडण्यासाठी सज्ज आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याकडून शनिवारी ट्वीट करुन भारताला अनावश्यक सल्ला देण्याचं काम केलं गेलं. यावरुन पाकिस्तानमध्ये खळबळ माजल्याचं स्पष्ट होतं. आपल्या कार्यकाळात भारत निष्पक्ष काम करुन योग्य निर्णय घेईल, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हाफीज चौधरी यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, "आम्हाला आशा आहे की, भारत आपल्या कार्यकाळात प्रासंगिक नियम आणि मानकांचं पालन करेल. याशिवाय भारत अध्यक्ष झाला म्हणजे पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्याला या व्यासपीठावर आणू शकत नाही, असाही याचा अर्थ होतो."

loading image
go to top