
नवी दिल्ली : भारतातील शहरांवर हल्ले करतानाच भारतावरच चुकीचे आरोप करत कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज उघडे पाडले. पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतात लेह ते सर खाडीपर्यंत ३६ ठिकाणी सुमारे ४०० ड्रोनद्वारे हल्ला करून सर्वसामान्य नागरिकांना आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान आपले हवाई क्षेत्र बंद न करता नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करत आहे, असा हल्लाबोलही भारताने केला. तसेच, आपल्याच शहरांना भारत लक्ष्य करत असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विचित्र कल्पनाविलास असल्याची खिल्लीही भारताने उडवली.