esakal | शाळेची घंटा 21 सप्टेंबरपासून वाजणार, केंद्र सरकारने नियमावलीसह दिले आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

school

केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. यासाठी सरकारने नियमावली जारी केली आहे.

शाळेची घंटा 21 सप्टेंबरपासून वाजणार, केंद्र सरकारने नियमावलीसह दिले आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोनामुळे लॉकडाउन केल्यानंतर देशातील शाळाही बंद होत्या. अनलॉकच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये शाळांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र आता केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या आदेशानुसार 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच शाळा उघडता येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नियमावलीतसुद्धा याबाबत सांगण्यात आलं आहे. 

केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंटेन्मेंट झोनमध्ये शाळा उघडता येणार नाहीत. कंटेंनमेंट झोनच्या बाहेरच शाळा उघडता येतील. शाळा सुरु केल्या तरी प्रार्थना, खेळ आणि इतर कार्यक्रम सुरु कऱण्यास परवानगी नाही. कारण यावेळी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम महत्वाचा असून याबाबत सक्तीने सूचना केल्या आहेत.

तसंच सरकारने असंही म्हटलं आहे की, डिस्टन्स लर्निंग सुरुच ठेवलं जाईल आणि त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. याशिवाय शाळांमध्ये सॅनिटायझेशनबाबतही काही सूचना सरकारने केल्या आहेत. 

हे वाचा - देशाच्या शिक्षण धोरणात सरकारचा प्रभाव कमीत कमी असावा - पंतप्रधान

आदेशामध्ये म्हटलं आहे की, नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षकांकडून माहिती मिळाल्यानंतर शाळेला जाता येईल. मात्र यातही कंटेनमेंट झोनमध्ये असेलल्या विद्यार्थ्यांना शाळेला जाता येणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेतसुद्धा पालक आणि शिक्षकांच्या लेखी परवानगीनंतरच जाता येईल. 

विद्यार्थ्यांसाठी
- शाळेत येण्यासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक
- लॉकर वापरता येतील, मात्र शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन सक्तीचे
- जलतरण तलाव, सामूहिक खेळांना परवानगी नाही
- पुस्तके, वह्या, पेन्सिल, पेन, पाण्याची बाटली अशा गोष्टी एकमेकांना देता येणार नाहीत
- प्रात्यक्षिकांच्या वेळा वेगवेगळ्या असतील.

शाळांसाठी...
- विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या वेळा निश्चित कराव्यात
- वर्गाऐवजी खुल्या मैदानात शिकविण्याच्या पर्यायाचा विचार करावा
- ऑनलाइन व डिस्टन्स लर्निंगची व्यवस्था करावी
- शाळा उघण्यापूर्वी निर्जंतुकीकरण गरजेचे
- केवळ ५० टक्के शिक्षकांनाच ऑनलाइन टीचिंग किंवा टेलि कौन्सिलिंगसाठी बोलवावे
- बायोमेट्रिक उपस्थिती ऐवजी इतर पर्यायांचा वापर करावा
- सर्वांच्या तपासणीसाठी पल्स ऑक्सिमीटर आवश्यक

यांना प्रवेश नाही...
- क्वारंटाइन झोनमधील विद्यार्थी, शिक्षक वा कर्मचारी
- विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना कोणताही आजार असल्यास

याशिवाय शाळेत अशाच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रवेश द्यावा ज्यांना कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. एखाद्या वेळी कोणत्याही शाळेत कोरोनासदृश्य लक्षणं आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करून घ्यावी असंही नियमावलीत सांगण्यात आलं आहे. 

loading image