India exported 114,570 tonnes of honey in 2025-26, earning ₹1,834 crore and creating opportunities for beekeeping-based rural businesses.
esakal
लासलगाव: भारतीय नैसर्गिक मधाची जागतिक बाजारपेठेतील मागणी वाढत असून, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत देशाने ४१ हजार ८५३ टन मधाची निर्यात केली. यातून ६३४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताने एक लाख १४ हजार ५७० टन मधाची निर्यात करून एक हजार ८३४ कोटी रुपयांची कमाई केली. वाढती जागतिक मागणी आणि मधुमक्षिकापालनाच्या विस्तारामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची नवी संधी उपलब्ध होत आहे.
कोविडनंतर वाढलेल्या आरोग्यविषयक जागरूकतेमुळे मधाच्या मागणीत वाढ झाली आहे. खाद्यपदार्थ, दैनंदिन आहार आणि औषधनिर्मिती क्षेत्रात मधाचा वापर होत असल्याने भारतीय मधाला परदेशातही चांगली मागणी आहे. भारतातील विविध हवामान परिस्थिती आणि वनस्पतींच्या वैविध्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा मध उत्पादित करण्याची संधी मिळते.