esakal | कृषी विधेयकावरून राज्यसभेत गोंधळ; एनडीएकडे नाही बहुमताचा आकडा
sakal

बोलून बातमी शोधा

india parliament

भाजप ही विधेयके राज्यसभेच्या वादळातूनही सुरक्षित तारून नेण्याची पूर्ण चिन्हे आहेत. कॉंग्रेस व भाजपने आपापल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे.

कृषी विधेयकावरून राज्यसभेत गोंधळ; एनडीएकडे नाही बहुमताचा आकडा

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - बहुचर्चित तीन कृषी विधेयके राज्यसभेत मांडण्यात येत असून सभागृहात चर्चेवेळी मोठा गोंधळ झाला आहे. कोरोना परिस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनातील दोन्ही सभागृहांतील व गॅलऱ्यांमध्येही केलेली खासदारांची आसन व्यवस्था व विविध कारणांमुळे अनुपस्थित असणारे सुमारे २० ते २५ सर्वपक्षीय खासदार, या पार्श्‍वभूमीवर चर्चा व या विधेयकांना राज्यसभेची मंजुरी अत्यंत वादळी ठरत आहे. खासदारांची बसण्याची व्यवस्थाच अशी आहे की आवाजी मतदानानंतरही डावे किंवा इतरांनी मतविभाजनाचा हट्ट धरला तर मतविभाजन हे यंत्रांद्वारे घेणे शक्‍य नाही. त्यामुळे मतपत्रिकांद्वारेच मतदान घ्यावे लागेल. त्यासाठीही लोकसभा सचिवालयाच्या मनुष्यबळाची मदत लागेल. 

हे वाचा - केंद्र सरकारने 2 हजाराच्या नोटेबाबत लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती

भाजप-एनडीएकडे राज्यसभेत आजही बहुमत नाही. सत्तारूढ भाजप आघाडीतील अकाली दलाने व तेलंगण राष्ट्र समितीसारख्या मित्रपक्षांनीही या विधेयकाला विरोध जाहीर केला आहे. अकाली दल (३ खासदार) वगळता भाजपला मदत करणाऱ्या एकाही पक्षाचा विरोध ठाम दिसत नाही. मात्र या विधेयकांवरून वाद केवळ एनडीएमध्ये आहेत असे नव्हे, कॉंग्रेस व तृणमूलच्या संसदीय नेत्यांमध्येही वाद पेटले आहेत. सप व द्रमुकसारखे कॉंग्रेसच्या बाजूने असणारे पक्षही राज्यसभेत कॉंग्रेसला नेहमीच अनुकूल भूमिका घेत नसल्याचे अनेकदा दिसले आहे. लोकसभेत सभात्याग करणाऱ्या शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह ३ खासदार उद्या ठाम विरोधाची भूमिका घेऊ शकतात. बीजू जनता दल, बसप व तेलंगण राष्ट्र समितीची विरोधाची भूमिका असली तरी हे पक्ष सभात्यागाचा मार्गानेच जाऊ शकतात असे सांगितले जाते. 

राज्यसभेतील पक्षीय बलाबल  
बाजूने -  एनडीए : भाजप - ८६ , अण्णाद्रमुक- ९ , जदयू- ५, (बीपीएफ, एमएनएफ, एनपीपी, एपीएफ, लोकजनशक्ती पक्ष, रिपब्लिकन, एसडीएफ) - एकूण ७, (अपक्ष व नामनिर्देशित)- ६, वायएसआर काँग्रेस- ६ 
विरोधात - काँग्रेस- ४०, तृणमूल- १३, समाजवादी पक्ष- ८, राष्ट्रीय जनता दल- ५, आम आदमी पक्ष- ३, (एमडीएमके, तेलुगू देसम, माकप, मुस्लिम लीग, आरएसपी, केरळ काँग्रेस एम,, पीएमके, पीडीपी) - एकूण ८ ते ९ , राष्ट्रवादी काँग्रेस ४, सीपीएम- ५, द्रमुक- ७, अकाली दल- ३, शिवसेना- ३. 
भूमिका अस्पष्ट असणारे : आसाम गण परिषद- १, बसप- ४, 
बीजू जनता दल- ९, तेलंगणा राष्ट्र समिती- ७ (३ अनुपस्थित)