esakal | केंद्र सरकारने 2 हजाराच्या नोटेबाबत लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

currency

नोटबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा बंद होतील किंवा त्यांची छपाई बंद केल्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून शनिवारी लोकसभेत 2 हजार रुपयांच्या नोटेबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली.

केंद्र सरकारने 2 हजाराच्या नोटेबाबत लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - नोटबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा बंद होतील किंवा त्यांची छपाई बंद केल्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून शनिवारी लोकसभेत 2 हजार रुपयांच्या नोटेबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली. अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सांगितलं की, 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. लोकसभेत लेखी उत्तरामध्ये त्यांनी म्हटलं की, सरकार कोणत्याही चलनातील नोटेबद्दल निर्णय घेण्याआधी आरबीआयचा सल्ला घेते. यामध्ये सर्वासामान्यांसाठी पुरेशा नोटा उपलब्ध करून देण्याचा समावेश असतो. 

आर्थिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 मध्ये प्रेसकडे 2 हजारांच्या नोटा छापण्यासाठी कोणतंही मागणीपत्र पाठवण्यात आलं नव्हतं. मात्र याचा अर्थ असा नाही की सरकार 2 हजाराच्या नोटेची छपाई बंद करण्याचा विचार करत आहे. यावरून आता हे स्पष्ट होत आहे की नोट बंद होणार अशा अफवा आहेत.

हे वाचा - कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन मुदतीपूर्वीच संपणार

अर्थ राज्य मंत्र्यांनी अशी माहिती दिली की, 31 मार्च 2020 पर्यंत 2 हजार रुपयांच्या 27 हजार 398 नोटा सर्क्युलेशनमध्ये आहेत. 31 मार्च 2019 पर्यंत हाच आकडा 32 हजार 910 नोटा इतका होता. अनुराग ठाकुर म्हणाले की, कोरोनाचे संकट पाहता करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही काळासाठी छपाई बंद होती. मात्र टप्प्या टप्प्याने छपाईचे काम सुरु करण्यात आले आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 23 मार्च 2020 पासून 3 मे 2020 पर्यंत नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. 4 मे पासून यामध्ये काम सुरु करण्यात आलं होतं. अनुराग ठाकुर यांनी अशीही माहिती दिली की, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये काही काळासाठी छपाईमध्ये अडथळा आला होता. तर SPMCIL च्या नाशिक आणि देवास इथल्या प्रेस लॉकडाऊनमध्ये बंद होत्या.