चीनच्या हालचालींवर भारताने लक्ष देण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चीनच्या हालचालींवर भारताने लक्ष देण्याची गरज
चीनच्या हालचालींवर भारताने लक्ष देण्याची गरज संरक्षण क्षेत्रातील तंज्ज्ञांचे मत; लडाख व अरुणाचल प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न

चीनच्या हालचालींवर भारताने लक्ष देण्याची गरज

पुणे : लडाख आणि अरुणाचल प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचे काम चीन करत आहे. पाकिस्तानला मदत करण्याच्या अनुषंगाने लडाखमध्ये हल्ले केले जात आहे. उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे चीनी सैन्य माघार घेईल, असा भ्रम भारताने ठेवू नये. कारण चीनने १९६२ मध्ये याच कालावधीत हल्ला केला होता. त्यामुळे इतिहासाचा धडा घेत लष्कराने चीन व पाकिस्तानचे संबंध, सैन्यांमधील युद्ध सराव आणि हालचालीवर लक्ष ठेवण्याची गरज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चीन तैवानबाबत सध्या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. तसेच भारताच्या पूर्व आणि पश्‍चिमी सीमांवर देखील तणाव वाढत आहे. या अनुषंगाने भारतीय लष्कराच्या सज्जतेसंदर्भात ‘सकाळ’ने संरक्षण तज्ज्ञांशी संवाद साधला. लेफ्टनंट जनरल दत्तात्रेय शेकटकर (निवृत्त) म्हणाले, ‘‘युद्धात उंच शिखरावरील सैन्याला नेहमी फायदा होतो. त्यामुळे भारतीय सैन्यदलाने शिखरांवर वर्चस्व स्थापित केल्यास चीनला हरविणे अधिक सोपे होल. त्याचबरोबर भारतीय हवाईदलाच्या क्षमतेचा वापर करण्याची आवश्‍यकता आहे. कोरोनाशी लढताना चीनने २०१९ मध्ये गलवान येथे घुसखोरी केली होती. चीनवर येत्या काळात विश्‍वास ठेवणे चुकीचे आहे. पूर्व लडाखमध्ये आता त्या अनुषंगाने सज्ज राहण्याची गरज आहे.’’

चीन सध्या नियंत्रण रेषेच्या (एलओसी) भागात विशेषतः अरुणाचल प्रदेश सीमेवर लष्करी हालचाली वाढवत आहे. भौगोलिक महत्त्व आणि सामरिक कारणांमुळे चीनचे तवांग ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर चीन सिलिगुडी कॉरिडोरवर लक्ष केंद्रित करत आहे. २०१७ मध्ये याच कारणामुळे डोकलामचा प्रश्‍न निर्माण झाला होता. हा भाग भारतासाठी महत्त्वाचा असून यावर चीनने नियंत्रण मिळविल्यास भारतीय सैन्याला येथून हलविण्यास चीनला फायदा होईल. आगामी काही महिन्यात भारताला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त) यांनी व्यक्त केली.

‘पीएलए’ची क्षेपणास्त्र रणनीती
‘पीएलए’द्वारे प्रामुख्याने क्षेपणास्त्र हल्ल्यांवर भर दिला जातो. त्यामुळे भारतीय लष्कराने चीनचे क्षेपणास्त्र बेस शोधून त्यावर हल्ले करण्याची गरज आहे. युद्ध सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित भारतीय हवाईदलाचे विमान या भागात पोचतील अशा प्रकारची व्यवस्था करण्याची गरज आहे. यापूर्वी भारतीय लष्कराने १९६२ मध्ये हवाईदलाचा वापर न करून मोठी चूक केली होती, असे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारताला याची आवश्‍यकता अधिक
- शस्त्रास्त्रांचा मोठा साठा करावा
- इंटिलीजेन्स, सर्व्हिलेन्स, तंत्रज्ञानाचा वापर, विज पुरवठा आदींवर लक्ष केंद्रित करणे
- प्रतिकूल परिस्थितीमध्ये सैन्याला लागणारे संसाधने उपलब्ध करणे
- बॅटल ग्रुप्सला तैनात करणे
- राजनैतिक प्रयत्नांवर भर देणे
- सीमावर्ती भागात सज्जता वाढवायला हवी

चीनद्वारे माहिती, लेझर, ड्रोन अशा विविध प्रकारचे युद्ध केला जाऊ शकतो. त्यासाठी भारताला आधुनिक शस्त्रास्त्र, वाहने, ड्रोन, कम्युनिकेशन सिस्टिम अशा संसाधनांची गरज आहे. एकीकडे चीन तैवानविरोधात आक्रमक भूमिका दाखवत असला, तरी भारताचे तैवानसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे आपल्याला देशहित लक्षात घेऊन योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
- एस एल देशमुख, कमोडोर (निवृत्त)

loading image
go to top