rks bhadoriya
rks bhadoriya

पाकिस्तान-चीन सीमेवर एकाचवेळी युद्धासाठी तयार; हवाईदल प्रमुखांचे प्रतिपादन

नवी दिल्ली- सीमेवर आडमुठेपणा दाखविणाऱ्या चीनवर दबाव वाढविण्यासाठी भारतानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. या रणनीती अंतर्गत हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांनी, भारत एकाचवेळी दोन्ही आघाड्यांवर (पाकिस्तान आणि चीन सीमेवर) युद्धासाठी तयार आहे. कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा आज चीनला दिला.

‘‘हवाईदल कोणत्याही दुस्साहसाचे उत्तर देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून टू फ्रंट वॉर आणि पारंपरिक युद्धासाठी पूर्णपणे तयार आहे. भविष्यात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संघर्षात हवाईदलाची शक्ती विजयासाठी निर्णायक ठरेल,’’ असे प्रतिपादन हवाईदलाच्या वार्षिक पत्रकार परिषदेदरम्यान एअर मार्शल भदोरिया यांनी केले.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान शहीद; 3 जखमी

ते म्हणाले, ‘‘लडाख सीमेवर सामरिकदृष्ट्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी लढाऊ विमाने तैनात करण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी हवाईदल तयार आहे. केवळ लडाख नव्हे तर इतरही संवेदनशील ठिकाणांबाबतही हवाईदल सजग आहे. आजूबाजूला होणाऱ्या घडामोडी पाहता सैन्यदलांना मजबूत आणि सजग राहण्याची आवश्यकता आहे. मात्र भारतीय हवाईदल सर्वोत्तम सैन्यदलांपैकी एक आहे. चीनलाही आपल्या ताकदीची जाणीव झाली आहे. अगदी विक्रमी वेळेत राफेल, चिनूक, अपाचे यासारखी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आपण उपयोगात आणली आहेत. पुढील तीन वर्षांत राफेल आणि तेजस या हलक्या लढाऊ विमानांचा ताफा (एसीए मार्क १ स्क्वाड्रन) पूर्ण शक्तीनिशी कार्यरत होईल.

सीमावादावर कोअर कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची सातव्या टप्प्यातील चर्चा पुढील आठवड्यात (१२ ऑक्टोबरला होणार आहे) त्यावर भाष्य करताना हवाईदल प्रमुखांनी सैन्यमाघारीबाबत अद्याप निर्णायक कार्यवाही चीनकडून झाली नसल्याकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले, की सैन्यमाघार कशा प्रकारे होते यावर या वाटाघाटी अवलंबून आहेत. वाटाघाटीतूनच तोडगा निघावा ही अपेक्षा आहे. परंतु सध्या याबाबतची प्रगती अतिशय मंद आहे. प्रत्यक्षात जमिनीवरील वस्तुस्थिती काय आहे, ते पाहूनच पुढील कारवाई केली जाईल.

व्याजावर व्याज माफीः सरकारच्या शपथपत्रावर सुप्रीम कोर्ट असमाधानी

युद्धही नाही अन् शांतताही नाही

पाकिस्तान सीमेवरील तणावावर बोलताना हवाईदल प्रमुख भदोरिया म्हणाले, की उत्तर सरहद्दीवर विचित्र परिस्थिती आहे. येथे युद्धही नाही आणि शांतताही नाही, अशी अवस्था आहे. मात्र, सैन्यदले कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. चिनूक, अपाचे या लढाऊ हेलिकॉप्टर सोबतच राफेल लढाऊ विमानांनी हवाईदलाची मारक क्षमता आणखी वाढविली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com