चिंताजनक! देशात 24 तासांत 14,199 रुग्ण आढळले; निम्मे महाराष्ट्रात

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 22 February 2021

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 14,199 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. 9,695 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 83 रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरोना विषाणू आपले हातपाय पुन्हा पसरत असल्याचं दिसून येत आहे. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,10,05,850 झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत 1,06,99,410 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1,56,385 लोकांचा जीव गेला आहे. देशात सध्या कोरोनाचे 1,50,055 सक्रिय रुग्ण आहेत. देशात 16 जानेवारीला लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली होती. आतापर्यंत  1,11,16,854 लोकांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे. 

इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत दिसत आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6,971 कोरोना रुग्ण आढलले आहेत, तर 2,417 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात 35 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21,00,884 झाली आहे. आतापर्यंत 19,94,947 रुग्णांनी कोरोनाला हरवलं आहे. राज्यात सध्या  52,956 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

महाराष्ट्रातील अनेक शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात 1,176 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे शहरात सोमवारपासून काही निर्बंध लादण्यात आले आहे. शहरात रात्री 11 ते सकाळी 6 संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India reports 14199 new COVID19 cases 83 deaths last 24 hours Union Health Ministry