esakal | 137 दिवसांत आढळले 1 कोटी रुग्ण, देशातील आकडा 2 कोटी पार

बोलून बातमी शोधा

Corona

137 दिवसांत आढळले 1 कोटी रुग्ण, देशातील आकडा 2 कोटी पार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशातील कोरोनाचा वेग मंदावल्याने थोडासा दिलसा मिळाला असला तरी अवघ्या 137 दिवसात भारतातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा हा 2 कोटींच्या घरात पोहचलाय. मागील 24 तासांत 3 लाख 55 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. 1 मेच्या तुलनेत मागील तीन दिवसांत नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. परंतु देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 2 कोटींच्या घरात पोहचलाय. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या देशांच्या यादीत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ 137 दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटीहून 2 कोटींच्या घरात पोहचला आहे. 1 लाख ते 1 कोटी या आकडेवारीसाठी 360 दिवसांचा अवधी लागला होता. आता केवळ 137 दिवसांत पुढील एक कोटी रुग्ण वाढले असून कोरोनाचा प्रादुर्भाव खूपच मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसते.

एका दिवसात 3400 हून अधिक लोकांचा मृत्यू

सोमवारच्या आकडेवारीनुसार देशात 3 लाख 55 हजार 828 नवे रुग्ण आढळले असून मागील 24 तासांत 3 हजार 438 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार देशातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 2 लाख 75 हजार 543 इतका आहे. 1 मे रोजी देशात 4 लाख 1 हजार 993 नवे रुग्ण आढळले होते. 2 मे ला 3 लाख 92 हजार 488 केसेस समोर आल्या होत्या, कोरोनाची सक्रीय रुग्ण संख्या 34 लाख 44 हजार 548 इतकी आहे.

दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्णांनी गमावले प्राण

राजधानी दिल्लीमध्ये मागील 24 तासांत 448 लोकांनी प्राण गमावले आहेत. एका दिवसांत सर्वाधिक रुग्ण दगावण्याची आतापर्यंतची ही पहिलीच वेळ आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. 23 राज्यासह केंद्र शासित प्रदेशात कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. 12 राज्यातील सक्रीय रुग्णांची संघ्या एक लाखपेक्षा अधिक आहे. तर 7 राज्यात 50 हजारहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत.