India: सिंघू बॉर्डर रिकामी करा; तरुणाच्या हत्येनंतर सुप्रीम कोर्टात याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंघू बॉर्डर

सिंघू बॉर्डर रिकामी करा; तरुणाच्या हत्येनंतर सुप्रीम कोर्टात याचिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सिंघु बॉर्डरवर ३५ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर दिल्ली हरयाणा सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. निहंग्या शीखांच्या एका समुहाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची मागणी केली आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी पहाटे सिंघु सीमेवर एका तरुणाचा हात आणि पाय कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुणाच्या हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

लखबीर सिंग असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. लखबीरच्या हत्येनंतर शशांक शेखर झा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी सांयकाळी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणी तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. यात म्हटलं आहे की, सिंघू बॉर्डर लवकरात लवकर रिकामी करण्यात यावी. शेतकऱ्यांचे आंदोनल सुरु असलेल्या व्यासपीठाजवळच तरुणाचा मृतदेह सापडला होता.

हेही वाचा: पूरग्रस्तांसाठीचे पॅकेज फसवे : चंद्रकांत पाटील

शेतकरी आंदोलनावरून याआधी सुप्रीम कोर्टाने फटकारले होते. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, तुम्ही रेल्वे, महामार्ग सर्व बंद करत आहात. शहरातील लोकांचे बिझनेस बंद करावेत का? शहरातील लोक तुमच्या आंदोलनामुळे आनंदी आहेत का? तुम्ही शहरात आंदोलन करण्याची परवानगी मागताय. तुम्ही आता शहराचा गळा घोटणार आहात का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता.

सिंघू बॉर्डरवर तरुणाच्या हत्येप्रकरणी आता एका निहंग्या तरुणाने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. सरवजीत सिंह असं त्याचं नाव असून आपणच हत्या केली असल्याचा दावा त्याने केला आहे. पोलिस त्याला शनिवारी न्यायालयात हजर करतील. त्याआधी सरवजीतची वैद्यकीय तपासणी केली जाईल. घटनेची जबाबदारी निहंग्यांचा गट असलेल्या निर्वेर खालसा उडना दलाने घेतली आहे. त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या हत्येचा दावा केला आहे. लखबीरने त्यांच्या धार्मिक ग्रंथाचा अवमान केल्यानं हत्या केली असंही त्यात म्हटलं आहे.

loading image
go to top