
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चौफेर मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. गृह मंत्रालयानेही संभाव्य सुरक्षेसाठी सर्व राज्यांना ७ मे रोजी रंगीत तालीम घेण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची या अनुषंगाने दूरध्वनीवरून चर्चा झाली. ‘दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही भारताच्या पाठीशी आहोत’, असे सांगत पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. जपाननेही भारताला पाठिंबा दिला आहे.