esakal | VIDEO - भारताच्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीची यशस्वी चाचणी; जगात चारच देशांकडे असे तंत्रज्ञान
sakal

बोलून बातमी शोधा

drdo

हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये आपल्याला एकदा यश आल्यानंतर आपण चीनचे सुरक्षा कवच देखील सहज भेदू शकतो अशी माहिती एका शास्त्रज्ञाने दिली.

VIDEO - भारताच्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीची यशस्वी चाचणी; जगात चारच देशांकडे असे तंत्रज्ञान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली -  पुढील पिढीतील अत्याधुनिक अशा हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्रांच्या निर्मितीच्यादृष्टीने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आज स्वदेशी बनावटीच्या आणि स्क्रॅमजेट इंजिनाचे बळ असलेल्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉनस्ट्रेटर व्हेईकलची (एचएसटीडीव्ही) यशस्वी चाचणी घेऊन एक मोठा पल्ला गाठला आहे. या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांचे स्वागत केले. हायपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये हे यश मैलाचा दगड ठरणार असून यामुळे पुढील काही वर्षांमध्ये देशातच हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तयार केली जाऊ शकतील. 

भारताने या वाहकाच्या चाचणीसाठी प्रथमच स्वदेशी बनावटीच्या प्रॉपल्शन सिस्टिमचा वापर केला असून पुढील टप्प्यातील क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी सर्वप्रकारच्या जटिल तंत्रज्ञानाचा तिढा सोडविण्यात आला आहे. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास ओडिशातील डॉ. अब्दुल कलाम बेटावरील प्रक्षेपण स्थळावरून या वाहकाने स्क्रॅमजेट इंजिनाच्या माध्यमातून आकाशात झेप घेतली, यावेळी त्याचा वेग हा ध्वनीपेक्षा सहापटीने अधिक होता. या वाहकाने सर्व तांत्रिक निकष पूर्ण केले असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. आताही रॅमजेट इंजिनाची जागा स्क्रॅमजेटने घेतली असून याआधीही मागील वर्षी जून महिन्यामध्ये अग्नी क्षेपणास्त्राच्या सॉलिड रॉकेट मोटरच्या आधाराने या वाहकाची चाचणी घेण्यात आली होती पण ती अपयशी ठरली होती. 

जगातील चार देशात भारत
या स्वदेशी बनावटीच्या वाहकाचा दुहेरी उपयोग होऊ शकेल. नागरी उपक्रमाबरोबरच कमी खर्चामध्ये उपग्रहांचे प्रक्षेपण आणि लष्करी हेतूंसाठी वापरल्या जाणाऱ्या दीर्घपल्ल्याच्या क्रुझ क्षेपणास्त्रांच्या निर्मितीलाही यामुळे वेग येणार आहे. सध्या अमेरिका, रशिया, आणि चीन केवळ या तीनच देशांकडे ही क्षमता असून त्या पंक्तीमध्ये आता भारताचा देखील समावेश झाला आहे. 

चीनचे कवच भेदणार 
हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये आपल्याला एकदा यश आल्यानंतर आपण चीनचे सुरक्षा कवच देखील सहज भेदू शकतो अशी माहिती एका शास्त्रज्ञाने दिली. संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्या देशाने आता आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने पावले टाकायला सुरुवात केली असून आजचे यश देखील त्याचदृष्टीने पाहणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.