कोरोना लस कधी येणार आणि सर्वात आधी कोणाला मिळणार?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

देशातील लसनिर्मितीच्या घडामोडीबरोबरच जगभरातील लशींच्या चाचणींवरदेखील भारत लक्ष ठेवून आहे

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या जगाला सध्या फक्त प्रभावी लशीच्या आगमनाची चाहूल आहे. 150 हून अधिक कोरोनावरील लशींची सध्या जगभरात संशोधन आणि चाचणी सुरु आहे. मात्र, आतापर्यंत एकाही लशीला जागतिक वापरासाठी मान्यता मिळाली नाहीये. फक्त रशियाने आपल्या स्फुटनिक व्ही या लशीला ऑगस्ट महिन्यात मान्यता दिली आहे. मात्र या लशीची मोठ्या प्रमाणावर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे आणि या चाचणीच्या निष्कर्षांची जगभरात उत्सुकता आहे. भारतात देखील कोरोनावरील तीन लशींच्या निर्मितीची आणि चाचणीची प्रक्रिया सुरु आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात सध्या या लस आहेत. यातील दोन लशींची निर्मिती ही भारतीय संशोधकांनीच केली आहे. 

हेही वाचा - भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने हाथरस पीडितेचा VIDEO केला शेअर; महिला आयोगाने दिला इशारा

कोरोनाची लस कधीपर्यंत येईल आणि कुणाला आधी लस मिळेल या साऱ्या प्रश्नांची उत्तरे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आज रविवारी दुपारी एक वाजता 'संडे संवाद' या कार्यक्रमात देणार आहेत. भारताचा कोविड व्हॅक्सिन प्लॅन ते देशासमोर ठेवणार आहेत. 

भारतातील लशींची अवस्था काय आहे?
- आयसीएमआर-भारत बायोटेक यांची Covaxin ही लस सध्या दुसऱ्या टप्प्यात असून देशातील अनेक सेंटरमध्ये तिची चाचणी सुरु आहे.
- जॉयडस कॅडिलाची ZyCov-D या लशीची मानवी चाचणी सध्या सुरु आहे. 
- ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका यांच्या Covishield या लशीची चाचणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया घेत असून ती दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहे.   

हेही वाचा - Corona updates: देशातील कोरोना रुग्णसंख्या 65 लाखांच्या वर; आतापर्यंत 7.8 कोटी चाचण्या

कोविड-19 व्हॅक्सिन पोर्टल झाले लाँच
आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी 28 सप्टेंबर रोजी कोविड-19 व्हॅक्सिन पोर्टल लाँच केलं आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने हे पोर्टल बनवलं आहे. यावर भारतात कोविड-19 लशीसंदर्भातील सर्व माहिती मिळेल. त्यानंतर हळूहळू वेगेवेगळ्या आजारांशी निगडीत सर्व माहिती त्यावर उपलब्ध करुन दिली जाईल. कोणती लस चाचणीच्या कोणत्या टप्प्यात आहे, याविषयी इत्यंभूत माहिती यावर मिळेल. लशीबाबत सर्व माहिती एका जागी सुव्यवस्थितरित्या मिळावी, म्हणून ICMRने या पोर्टलची निर्मिती केली आहे. 

लसनिर्मितीत भारताचे प्रयत्न
देशातील लसनिर्मितीच्या घडामोडीबरोबरच जगभरातील लशींच्या चाचणींवरदेखील भारत लक्ष ठेवून आहे. पंतप्रधानांचे संशोधक सल्लागार के. विजयराघवन यांच्या नेतृत्वात एक टिम कोविडच्या लशीसंदर्भातील सर्व घडामोडी पाहते. या टिमने अनेक फार्मा कंपन्यांसोबत चर्चा करुन लसनिर्मितीबाबत त्यांची क्षमता आणि तयारी यांचा अंदाज घेतला आहे. जागतिक पातळीवर एखाद्या लशीला मान्यता मिळताच ती लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. 

हेही वाचा - रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली, रात्री उशिरा झाली हार्ट सर्जरी

कुणाला मिळेल आधी लस
हर्षवर्धन यांनी अनेक ठिकाणी हे सांगितलंय की, कोरोना लस उपलब्ध झाल्यावर सर्वांत आधी ती आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना मिळेल. यानंतर ती वयोवृद्ध आणि गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना देण्यात येईल. त्यानंतर लशीच्या उपलब्धतेनुसार सर्वांना लस देण्यासाठी प्रयत्न केले जातील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Vaccine Plan Health minister Dr Harshavardhan sunday sanvad