esakal | शिक्षणात देश ‘विश्वगुरू’ बनेल

बोलून बातमी शोधा

Education
शिक्षणात देश ‘विश्वगुरू’ बनेल
sakal_logo
By
डॉ. विद्या येरवडेकर

‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ने आपल्या सर्वांसाठी एक नवीन मार्ग उघडला आहे. भारतीय शिक्षणव्यवस्थेचे हे परिवर्तन संपूर्ण जग पाहात आहे. भारतातील शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल निश्चितच घडतील आणि ज्यामुळे भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ बनू शकेल.

केंद्र वा राज्य सरकार या दोघांचीही शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन करण्यात समान भूमिका व महत्त्व आहे. ९९३ विद्यापीठे, ३९,९३१ महाविद्यालये आणि १०,७२५ इतर शिक्षणसंस्था असलेल्या भारतामध्ये जगातील सर्वांत मोठी शिक्षण प्रणाली आहे. भारतातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सध्याचे सकल नावनोंदणी प्रमाण (जीईआर) अंदाजे २६ टक्के आहे. १९.२ दशलक्ष पुरुष आणि १८.२ दशलक्ष महिलांसह उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी ३७.४ दशलक्ष इतकी आहे. एकूण नोंदणीच्या ४८.६ टक्के महिलांचे प्रमाण आहे. शैक्षणिक अर्थसंकल्प २०२१ हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रतिबिंब आहे, जे २०२० मध्ये तयार केलेले आहे.

औद्योगिक विकासाला चालना

महाराष्ट्राने देशाच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली आहे. राज्याने काही प्रमुख गोष्टींमध्ये सहभागी होऊन खासगी संस्था स्थापन करताना सहकारी चळवळीचा त्यात समावेश करून आपली उच्च शिक्षण संरचना बनविली आहे. प्रख्यात सुधारणावादी वसंतदादा पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रात १९८३ पूर्वी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयांची संख्या कमी होती. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी शिक्षणासाठी कर्नाटक आदी राज्यांत जात होते. त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात खासगी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालये स्थापन करण्याचे विधेयक मंजूर केले. आज वसंतदादांमुळेच महाराष्ट्र अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षणाचे केंद्र बनला आहे. त्यांच्या या दूरगामी धोरणामुळेच महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे.

शैक्षणिक संस्थांमध्ये वाढ

भारतातील आधुनिक शिक्षण प्रणालीच्या विकासात महाराष्ट्राची अग्रणी भूमिका आहे. १८५७ मध्ये स्थापलेले मुंबई विद्यापीठ पदवीधरांच्या संख्येत जगातील सर्वांत मोठे विद्यापीठ आहे, ज्यामध्ये १४१ पेक्षा जास्त संलग्न महाविद्यालये आहेत. तसेच, १९४९ मध्ये स्थापलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे पुणे विद्यापीठ आणि पूना विद्यापीठ हे एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. सरकारने १९८२ मध्ये खासगी व्यवस्थापनांना कोणतेही आर्थिक अनुदान न देता स्व-वित्तपुरवठा आधारावर नवीन व्यावसायिक महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली. परिणामी अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण आणि शिक्षक-शिक्षण इत्यादी अनेक महाविद्यालये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि भारतीय वैद्यकीय परिषद या संबंधित राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या परवानगीने सुरू केली. चार दशकांत शैक्षणिक संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; विशेषत: गेल्या दोन दशकांत खासगी स्व-वित्तपुरवठा करणाऱ्‍या संस्थांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली.

सर्वाधिक पॉलिटेक्निक कॉलेज

महाराष्ट्रात सर्वाधिक शाळा आणि विद्यापीठे असल्यामुळे हे भारतातील शिक्षणाचे केंद्र बनले आहे. आयआयटी बॉम्बे, मुंबई युनिव्हर्सिटी इत्यादी देशातील अग्रणी संस्था महाराष्ट्रात आहेत. २०११ च्या जनगणना आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण साक्षरतेचे प्रमाण ८२.३४ टक्के आहे, ज्यामध्ये पुरुष साक्षरता ८८.३८ टक्के तर महिला साक्षरता ७८.५७ टक्के एवढी आहे. आज इतर राज्यांच्या तुलनेत विद्यापीठांत (घटक घटकांसह) विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीमध्ये महाराष्ट्र ९,४८,९५५ इतक्या संख्येसह आघाडीवर आहे. महाराष्ट्र हे देशातील अग्रणी सात राज्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रति लाख लोकसंख्येमध्ये २८ पेक्षा अधिक महाविद्यालये आहेत. सर्वाधिक पॉलिटेक्निक महाविद्यालयेही महाराष्ट्रात असून ही संख्या ६६९ पैकी ६४४ इतकी आहे. ‘एनआयआरएफ २०२०’च्या रँकिंगनुसार महाराष्ट्रातील १२ महाविद्यालये पहिल्या १०० महाविद्यालयांच्या यादीत आहेत. चौथ्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे अव्वल आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे यादेखील या यादीचा भाग आहेत.

उच्चशिक्षणात पुणे केंद्रबिंदू

उच्चशिक्षणासाठी पुणे शहर हे कायमच केंद्रबिंदू राहिलेले आहे. १८५४ मध्ये पूना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सध्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सीओईपी) हे भारतात स्थापित होणारे पहिले व्यावसायिक महाविद्यालय होते आणि १८८५ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे फर्ग्युसन महाविद्यालय प्रथम खासगी व्यवस्थापित महाविद्यालय म्हणून स्थापित केले गेले. १९३७ च्या शेवटी, तीन उदार (Liberal Arts ), कला महाविद्यालये, तीन व्यावसायिक महाविद्यालये आणि २१ इतर विशेष व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शाळा होत्या. या संस्थांमुळेच २० व्या शतकाच्या उत्तरार्धात पुणे शहराला औद्योगिक राजधानीचे शहर म्हणून ओळखले जात होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १९४८ मध्ये स्थापन झाले आणि पहिल्याच वर्षी विद्यापीठाशी १८ महाविद्यालये संलग्न झाली व ८००० पेक्षा जास्त विद्यार्थिसंख्या होती. आता विद्यापीठाकडे ४६ पदवीधर विभाग, २६९ पेक्षा अधिक संलग्न महाविद्यालये, ११ केवळ महिलांसाठी महाविद्यालये आणि १२ संशोधन संस्था असून, दरवर्षी १,७०,००० विद्यार्थी नोंदणी होतात.

पुण्यात सर्वाधिक विद्यार्थी

पुण्याला ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. पुण्यामध्ये भारतातील कोणत्याही शहरांपेक्षा विद्यापीठांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात १५ विद्यापीठे आणि ४५० पेक्षा अधिक उच्च शिक्षण संस्था आहेत. (AISHE रिपोर्ट २०१८-१९). पुण्यात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च इत्यादी नामांकित संशोधन संस्था आहेत. पुण्यात सर्वाधिक विद्यार्थी आहेत. सहा लाखांहून अधिक विद्यार्थी (१४,००० परदेशी विद्यार्थ्यांसह) भारतातील सर्व राज्ये आणि ८५ वेगवेगळ्या देशांमधून येतात. त्यामुळे विद्यापीठ परिसरातील घरांसाठी मागणी वाढली आहे. ज्यामुळे रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक क्रियाकलापांना बाजारपेठ तयार होते. अशा प्रकारे, पुण्यातील स्थानिक अर्थव्यवस्थेवर विद्यापीठांचा मोठा परिणाम झाला आहे आणि खासगी शैक्षणिक संस्था आणि गृहनिर्माण/व्यावसायिक घडामोडींमधून पुणे महापालिकेला मिळकतकर नफा मिळाला आहे.

परदेशी विद्यार्थ्यांना संधी

गेल्या दोन दशकांत झालेला आणखीन एक बदल म्हणजे ‘स्टडी इन इंडिया’ अभ्यासक्रम. याअंतर्गत सिंबायोसिस आणि पुणे विद्यापीठांसारख्या विद्यापीठांत अनेक विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड, युरोप, सिंगापूर आदी देशांमधून येतात. येथील विद्यापीठांनी काही सर्वोत्कृष्ट परदेशी विद्यापीठांचे सहकार्य यासाठी घेतले आहे आणि त्यामुळे एक्स्चेंज प्रोग्राम्ससाठी’ पुण्याहून परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा कलही वाढला आहे. त्याचप्रमाणे, प्राध्यापक विनिमय कार्यक्रमांनी पुणे विद्यापीठाला त्यांच्या सहयोगी भागीदारांसह शिक्षण किंवा संयुक्त संशोधनासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जाण्यास मदत केली आहे. आता स्टडी इन इंडिया प्रोग्रॉम सुरू झाल्याने आम्ही मोठ्या संख्येने परदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी आकर्षित करत आहोत. पुण्यात ८५ देशांतील परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

पुण्यात विद्यार्थी येण्याची कारणे

 • मोठ्या संख्येने विद्यापीठे, अभ्यासक्रमांत विविधता

 • पुण्याचे हवामान चांगले

 • सुरक्षित शहर

 • पुण्यात ११० पेक्षा जास्त एमएनसी आणि इतर कंपन्या. आयटी हब, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, स्टार्टअप्स, नोकरी शोधणाऱ्यांसाठी विविध संधींचे शहर.

राज्यातील विद्यापीठांची संख्या

 • केंद्रीय विद्यापीठ ०१

 • केंद्रीय मुक्त विद्यापीठ ००

 • राष्ट्रीय महत्त्व संस्था ०६

 • राज्य सार्वजनिक विद्यापीठे २२

 • राज्य विधिमंडळ अधिनियम अंतर्गत संस्था ००

 • राज्य मुक्त विद्यापीठे ०१

 • राज्य खासगी विद्यापीठे १८

 • राज्य खासगी मुक्त विद्यापीठ ००

 • सरकारी अभिमत विद्यापीठे ११

 • सरकारी अनुदानित अभिमत विद्यापीठे ०७

 • खासगी अभिमत विद्यापीठे १२

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालये

 • ८७३ - अनुदानित

 • २२२ - अंशतः अनुदानित

 • २२४ - कायमस्वरूपी विनाअनुदानित

(लेखिका सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती, प्रधान संचालिका आहेत.)