कोविड-19 विरोधातील लढाई जिंकतोय भारत? 5 चांगल्या बातम्यांनी होतंय स्पष्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 18 August 2020

एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे भीतीदायक असले तरी दुसरीकडे काही दिलासादायक बातम्याही आहेत.

नवी दिल्ली- भारतात कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus cases in India) 27 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात देशात 55 हजारांच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर 57 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 876 लोकांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 51,797 झाला आहे. एकीकडे हे आकडे भीतीदायक असले तरी दुसरीकडे काही दिलासादायक बातम्याही आहेत. भारतात चाचणी आणि विलगीकरणाच्या दिशेने प्रगती होत आहे. त्यामुळे देशात रिकव्हरी रेट वाढत असून मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. 

प्रेमाची बंदिश : पंडित जसराज व्ही. शांताराम यांचे जावई कसे बनले?

भारतात मृत्यू दर कमी

भारतातील 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, रुग्णांना लवकर शोधणे, वेळेत त्यांचे विलगीकरण करणे आणि त्यांच्यावर प्रभावी उपचार करणे यामुळे देशात मृत्यूदर कमी झाला आहे. भारतात कोरोना मृत्यू दर 1.92 टक्के आहे. भारताचा सर्वात कमी मृत्यू दर असणाऱ्या देशांमध्ये समावेश होतो.

रिकव्हरी रेट सातत्याने वाढतोय

देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 19,77,779 झाली आहे. याचा अर्थ देशात 73.18 टक्के लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. महाराष्ट्र, तामिळवाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील रिकव्हरी रेट कमी आहे. दिल्लीचा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. 

विक्रमी कोविड-19 चाचण्या

भारतात गेल्या 24 तासात विक्रमी 8.97 लाख कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 टेस्टिंग लॅब्सची संख्या वाढून 1,476 झाली आहे. यातील 971 सरकारी लॅब आहेत, तर 505 खाजगी लॅब आहेत. आतापर्यंत देशात जवळजवळ 3,0941,264 चाचण्या पार पडल्या आहेत. 

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकेकाळी परदेशात केलं होतं सेल्स...

देशात कोविड पॉझिटिव्हिटी रेट स्थिर

चाचण्यांचे प्रमाण वाढत असताना देशात कोविड पॉझिटिव्हिटी रेट स्थिर आहे. गेल्या 24 तासात  पॉझिटिव्हिटी रेट 8.81 टक्के होता, गेल्या आठवड्याचा सरासरी  पॉझिटिव्हिटी रेट 8.84 टक्के होता. गेल्या 15 दिवसांपासून  पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्यांच्या खाली राहिला आहे.  पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असणे महामारी नियंत्रणात येत असल्याचे लक्षण असते.

संक्रमण वेगात, पण जिवघेणे नाही

-आशियाच्या काही भागात कोरोना महामारीचे म्यूटेशन वेगाने वाढत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे संक्रमण वेगाने होत असले तरी, जिवघेणे नाहीये. D614G म्यूटेशन सामान्य कोरोना विषाणूपेक्षा 10 पटीपेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या म्यूटेशनच्या पसरण्याने जगभरात मृत्यूदरात मोठी कमी आली आहे. मलेशियामध्ये ज्या व्यक्तीमध्ये हा म्यूटेटेड विषाणू पसरला, तो भारतातूनचा आला होता. 

(edited by-kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india winning corona virus battle 5 things you need to know