Vaccination Updates: देशातील ६० टक्के युवकांनी घेतली लस - मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मोदी
Vaccination Updates: देशातील ६० टक्के युवकांनी घेतली लस - मोदी

देशातील ६० टक्के युवकांनी घेतली लस : मोदी

नवी दिल्ली : ‘कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेशी भारत यशस्वीपणे लढा देत असून यामध्ये युवकांचे सहभाग उल्लेखनीय आहे. लसीकरण सुरु झाल्यापासून चार आठवड्यांतच पंधरा ते अठरा या वयोगटातल्या साठ टक्के युवकांनी लशीचा डोस घेतला, ही अभिमानाची बाब आहे,’ असे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज केले. देशवासीयांनी लसीकरण मोहिमेवर दाखविलेला विश्‍वास ही आपली फार मोठी शक्ती आहे, असेही मोदी म्हणाले. (Corona Vaccination Updates)

पंतप्रधान मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा हा ८५ वा आणि या वर्षातील पहिला भाग होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. नंतर त्यांनी, कोरोना संसर्गाचा जनता समर्थपणे सामना करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

हेही वाचा: तुळजापूर : जिन्यावरून पडल्याने फौजदाराचा मृत्यू

ते म्हणाले की, ‘‘आतापर्यंत सुमारे साडे चार कोटी मुलांनी पहिला डोस घेतलेला आहे. याचा अर्थ, पंधरा ते अठरा वर्षांच्या वयोमर्यादेतील साठ टक्के युवकांनी ही लस घेतलेली आहे. शिवाय, सुमारे एक कोटी ज्येष्ठ नागरिकांनीही बूस्टर डोस घेतला आहे. हा खूपच सकारात्मक संकेत आहे. लोक सुरक्षित राहोत, आर्थिक प्रगतीचा वेग कायम राहो, हीच प्रत्येकाची इच्छा आहे.

इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्धस्मारकामधील ज्योतीमध्ये विलीन केल्यावरून वाद सुरु आहे. याचा उल्लेख मोदींनी टाळला असला तरी, या घटनेमुळे हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना आनंद झाल्याचे सांगितले. अनेक माजी सैनिकांनीही पत्र लिहून तसे कळविल्याचे मोदींनी सांगितले. ऊर्जा आणि प्रेरणा मिळविण्यासाठी राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट द्या, असे आवाहन मोदींनी यावेळी जनतेला केले.

पंतप्रधान मोदी उवाच...

प्लास्टिकच्याविरुद्धच्या अभियानाला आणखी गती

आणण्याची आवश्यकता

‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र ही आपली जबाबदारी

भारतीय संस्कृतीचे इतर देशांमध्येही आकर्षण

सर्वाना सन्मानाचे जीवन मिळावे, जिथे शेतकरी समृद्ध असावा,

असा भारत हवा आहे.

मुलांनी पाठविली ‘मन की बात’

देशाच्या अमृत महोत्सवाबाबत आपल्याला देशभरातून आणि विदेशांतूनही अनेक पत्र आणि सूचना येत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. आतापर्यंत एक कोटीहून अधिक मुलांनी आपली ‘मन की बात’ पोस्ट कार्डद्वारे लिहून पाठवल्याची माहितीही त्यांनी सांगितली. देशाच्या भविष्याप्रती आपल्या नव्या पिढीचे विचार किती व्यापक आहेत याची प्रचिती या पोस्ट कार्डांमधून येते, असे सांगून त्यांनी काही मुलांची पत्रे वाचूनही दाखविली.

Web Title: India Youth Vaccination Updates Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modivaccination
go to top