
'मदतकार्याचा वेग आणखी वाढवा'; पंतप्रधानांच्या हवाई दलाला सूचना
नवी दिल्ली: अवघा देश कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गाशी दोन हात करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई दलास मदत कार्याचा वेग आणि व्याप्ती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांनी आज पंतप्रधानांसमोर मदत कार्याचा सविस्तर आढावा सादर केला तसेच माल वाहतूक आणि आवश्यक वैद्यकीय साधनसामग्रीच्या वाहतुकीसाठी हवाई दल सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले. ऑक्सिजन टँकर आणि औषधे यांची जलदगतीने वाहतूक होणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
या मदत कार्यामध्ये मोठी आणि लहान अशी दोन्ही प्रकारची विमाने सहभागी झाली असून सर्व भाग या माध्यमातून कव्हर केले जात असल्याचे भदौरिया यांनी पंतप्रधानांना सांगितले. कोरोना काळामध्ये विविध मंत्रालये आणि संस्था यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी कोरोना एअर सपोर्ट सेल उभारण्यात आला आहे. हवाई दलाचे कर्मचारी हे चोवीस तास काम करत असल्याचेही भदौरिया यांनी स्पष्ट केले. हवाई दलाच्या अख्त्यारीत येणाऱ्या कोविड रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या असून जिथे शक्य आहे तिथे सर्वसामान्यांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: 'कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करणे ही राज्याची जबाबदारी'
डीआरडीओ मेडिकल प्लांट उभारणार
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) येत्या तीन महिन्यांमध्ये पाचशे मेडिकल ऑक्सिजन प्लांट्स उभारणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिली. या प्रकल्पांसाठी पीएम केअर फंडातून निधी दिला जाणार आहे. तेजस विमानांसाठी यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते त्याचा लाभ येथे होईल, असे राजनाथ यांनी ट्विटरवरून जाहीर केले.
Web Title: Indian Airforce Hepl During Covid 19 Should Increase Pm Narendra Modi Covid
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..