पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने आज पुन्हा एकदा सीमा ओलांडली. साधारणपणे १९४७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकदा संघर्षाच्या ठिणग्या उडाल्याचे चित्र पाहायला मिळते. प्रत्येकवेळी भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे..पहिले भारत-पाकिस्तान युद्ध (१९४७)स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे देश निर्माण झाल्यानंतर पहिले काश्मीर युद्ध झाले. त्यावेळी जम्मू- काश्मीरमध्ये राजसत्ता होती. पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांनी तेव्हा नंदनवनावर हल्ला केला होता. तेव्हाचे जम्मू- काश्मीरचे महाराजा हरीसिंह यांनी विनंती केल्यानंतर भारताने त्यांच्या मदतीसाठी लष्कर पाठविले होते..दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध (१९६५)काश्मीरच्याच मुद्यावरून ५ ऑगस्ट १९६५ रोजी दोन्ही देशांत सशस्त्र संघर्ष भडकला. हजारो पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोरांनी तेव्हा जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. या प्रदेशात अराजकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि स्थानिक बंडखोरीला खतपाणी घालण्यासाठी ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ची घोषणा करण्यात आली होती. भारतीय लष्कराने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवर संघर्षाची मोठी ठिणगी पडली. यावेळी दोन्ही देशांतील युद्ध हे २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत सुरू होते..बांगलादेश मुक्ती संग्राम (१९७१)पूर्व पाकिस्तानने (आताचा बांगलादेश) जेव्हा स्वातंत्र्याची मागणी लावून धरली त्याचवेळी पाकिस्तानने लष्करी बळाचा वापर करून हे बंड दडपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही आघाड्यांवर तेव्हा जोरदार संघर्ष झाला. अखेरीस पाकिस्तानी लष्कराने १६ डिसेंबर १९७१ मध्ये शरणागती पत्करली. या युद्धानंतर बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले..कारगिल युद्ध (१९९९)पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांनी कारगिल सेक्टरमधील काही डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर कारगिल युद्धाला तोंड फुटले होते. पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन विजय’ची घोषणा केली. भारतीय हवाई दलाने त्याला पाठिंबा दिला. भारताने पाकिस्तानच्या ताब्यातील सर्व प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर २६ जुलैला हे युद्ध संपले..उरी हल्ला (२०१६)पाकिस्तानी दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यामध्ये १९ जवान हुतात्मा झाले होते. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने २८ आणि २९ सप्टेंबर रोजी सीमेपार सर्जिकल स्ट्राईक केला होता. तेव्हाही भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची अनेक केंद्रे लक्ष्य केली होती. भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात अनेक दहशतवादी मारल्या गेले होते..पुलवामा हल्ला (२०१९)पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने प्रतिहल्ला करत पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त केला होता. या कारवाईसाठी लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर वार करत दहशतवाद्यांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या होत्या..पंधरा दिवसांत काय घडले?२२ एप्रिल - काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन पठारावर पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या २६ नागरिकांना चार ते पाच पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले. या हल्ल्याची जबाबदारी ‘लष्करे तैय्यबा’शी संबंध असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने घेतली होती. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरविले..२३ एप्रिल - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा सोडून दिल्लीला परतले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याशी विमानतळावरच चर्चा केली. भारत सरकारने त्याच दिवशी सिंधू जलकरार स्थगित करत अटारी-वाघा सीमा बंद केली, सार्क व्हिसा योजनेंतर्गत देण्यात येणारा पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्यास सांगण्यात आले तसेच दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागारांची हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने अतिरेक्यांची चित्रे जारी केली. .२४ एप्रिल - केंद्र सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारच्या सर्व निर्णयांना विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. दहशतवाद्यांना अकल्पनीय दंड मिळेल, अशी पंतप्रधान मोदी यांची बिहारच्या मधुबनीमध्ये घोषणा. पाकिस्तानकडून भारतीय नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याची आणि सिमला करार स्थगित करण्याची घोषणा.२५ एप्रिल - पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून पर्यटकांची माघार. मसूरीमध्ये काश्मिरी शाल विक्रेत्यांवर हल्ला. पाकिस्तानकडून हवाई क्षेत्र वापरण्यास भारतावर बंदी. .२७ एप्रिल - अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्याकडून भारताला पाठिंबा. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन. चीनकडून पाकिस्तानच्या विधानाचे समर्थन. २८ एप्रिल - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उच्चस्तरीय बैठकीत दहशतवादाच्या निपातासाठी सशस्त्र दलांना पूर्ण मुभा. २९ एप्रिल - सुरक्षा दलांच्या आश्वासनानंतर पर्यटक पहलगामला परतले..३० एप्रिल - पाकिस्तानी विमानांसाठी ३० एप्रिल ते २३ मे दरम्यान भारताचे हवाई क्षेत्र बंद. भारत २४ ते ३६ तासांत कारवाई करणार असल्याचा पाकिस्तानचा दावा. सौदी अरेबिया, चीन, अमेरिका, तुर्कीये आणि कतारकडून दोन्ही देशांना संयमाचे आवाहन.१ मे - पाकिस्तानहून येणारी टपाल आणि पार्सल सेवा बंद. अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटीजच्या ‘एक्स’ आणि ‘यूट्यूब’ अकाउंटवर बंदी.३ मे - सिंधू नद्यांचे पाणी रोखल्यास संबंधित धरणे उद्ध्वस्त करण्याची पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची धमकी..४ मे - पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी-२०२५ मध्ये पाक लष्कर आणि आयएसआयने पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोटमध्ये रचल्याची एनआयएच्या तपासात माहिती. देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये संभाव्य युद्धाला सामोरे जाण्यासाठी मॉक ड्रील करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश.६ मे - भारताच्या संभाव्य लष्करी कारवाईकडे देशाचे लक्ष. पंतप्रधान मोदींना पहलगाम हल्ल्याची पूर्वसूचना असल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.